थायलंडची राजकुमारी येणार: ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव नागपूर : बिहार येथील महाबोधी महाविहार समितीचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असतो, तर समितीच्या सदस्यांमध्ये चार हिंदू आणि चार बौद्ध असतात. विशेष म्हणजे, समितीचे अध्यक्ष हा हिंदूच असला पाहिजे, असे तेथील मंदिर कायदा म्हणतो, यात बदल व्हावा, सविस्तर चर्चा घडावी या उद्देशाने आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद २१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कामठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रात होईल, अशी माहिती ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष व माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.कुंभारे म्हणाल्या, ५९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती सोहळ्यानिमित्त ओगावा सोसायटीच्यावतीने २१ ते २३ आॅक्टोबर दरम्यान कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची सुरुवात २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या धम्म परिषदेतून होईल. याचे उद्घाटन थायलंडची राजकुमारी लुयांग राजादारासिरी जयंकुरा यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी महाबोधी सोसायटी, श्रीलंका भंते बानागल उपतीस्स नायक थेरो राहतील. यावेळी नेदरलँडचे भंते ओलांदो आनंदा थेरो, भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई, व्हिएतनामचे भंते थिक न्हात तु, श्रीलंकेचे भंते महिंद्रावान्सा थेरो, सर्वाेदया फाऊंडेशन श्रीलंकाचे अध्यक्ष ए.टी. आर्यरत्ने यांच्यासह अनेक महत्त्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थिकलशाचे आगमन होईल. येथे सायंकाळी ५ ते रात्री १० वाजतापर्यंत तर २२ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजतापर्यंत उपासकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. २२ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रात एमटीडीसीतर्फे बांधण्यात आलेले ‘मल्टिपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व मेडिटेशन’ सेंटरचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी राहतील. २३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ‘श्री सिद्धार्थ गौतम’ या हिंदी चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला आहे. पत्रपरिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक नवीन गुनरत्ने, अभिनेता गगन मलिक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी धम्म परिषद
By admin | Published: October 21, 2015 3:29 AM