नागपूर : २५८६ व्या बुद्ध जयंती व वैशाख पौर्णिमेचे औचित्य साधून संविधान परिवाराच्यावतीने चलो बुद्ध की ओर असा संदेश देत धम्म सकाळ रॅलीचे आयोजन केले आहे. येत्या २३ मे रोजी सकाळी ७ वाजता सम्राट अशोक चौक ते दीक्षाभूमी पर्यंत ही धम्म रॅली काढण्यात येत असल्याची माहिती संविधान परिवारचे मुख्य संयोजक राहुल मून यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.
यात संविधान परिवार, भिक्षू संघ, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध विहार समिती, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, राजकीय कार्यकर्ते, बौद्ध उपासक व उपासिका सहभागी होणार आहेत. रॅली सम्राट अशोक चौक उंटखाना येथून सकाळी ७ वाजता निघेल. मेडिकल चौक, जाटतरोडी चौक, बाबासाहेबांचा पुतळा, सरदार पटेल चौक, धंतोली पोलिस स्टेशन समोरुन पंचशील चौका, लोकमत चौक, काचिपुरा चौक मार्गे दीक्षाभूमी येथे रॅलीचा समारोप होईल.
यादरम्यान कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमीच्या प्राचार्या डॉ. भुवनेश्वरी मेहरे, उषा बागडे उपस्थित राहतील. रॅलीमध्ये ’बुद्धम् सरणम् गच्छामी’ या जयघोषासह शिस्तबद्ध पद्धतीने रॅली निघणार आहे. जास्तीत जास्त उपासक-उपासकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केली.