नागपूर : दीक्षाभूमी स्मारक समितीने, दीक्षाभूमीवर खोदकाम करून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून यापुढे स्मारक समितीचा हस्तक्षेप दीक्षाभूमीच्या बाबतीत होऊ देणार नाही. तसेच आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळाही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात येईल. त्याची घोषणा लवकरच भीमराव आंबेडकर करतील, अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी दिली.
रिपब्लिकन सेनेच्या वतीने रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काकासाहेब खंबाळकर म्हणाले, दीक्षाभूमीवर गरज नसताना विकासकामे करण्यात येत असल्याचे पाहून आंबेडकरी जनतेच्या मनातील राग उफाळून आला. त्यांनी आंदोलन करून ही कामे बंद पाडली. भविष्यात दीक्षाभूमीवरील स्मारक समितीने असे उपद्वयाप करू नये यासाठी स्मारक समिती बरखास्त करण्याची शिफारस धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. लवकरच दीक्षाभूमीचे कार्यालय भारतीय बौद्ध महासभा ताब्यात घेईल.
शासनाने दीक्षाभूमी उद्धवस्त करण्यासाठी पैसे दिलेले नाहीत, असेही खंबाळकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला रिपब्लिकन सेनेचे प्रदेश प्रवक्ते वसंत कांबळे, विदर्भ संघटक डॉ. भुषण भस्मे, प्रदेश कोषाध्यक्ष भगवान शेंडे, भारतीय बौद्ध महासभेचे विजेंद्र गणवीर आदी उपस्थीत होते.