नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष असले तरी साधे माणूसच होते. एका माणसावर कोट्यवधी माणसांच्या आणि पुढच्या अनेक पिढ्यांच्या जीवनपरिवर्तनाचा निर्णयक्षण येणे हे जगात क्वचितच घडले असेल. या महामानवावर मात्र ती जबाबदारी आली किंबहुना त्यांनी ती स्वीकारली आणि रक्ताचा एक थेंबही न सांडता अमुलाग्र क्रांती एकहाती यशस्वीही केली.
हजारो वर्ष ज्यांनी धर्माच्या गुलामीच्या बेड्यात काढले, अन्याय, अमानूष अत्याचार, अपमान सहन केला, त्या कोट्यवधी बांधवांच्या गुलामीच्या बेड्या डॉ. बाबासाहेबांनी एका क्षणात तोडल्या. त्या समस्तांना तथागत बुद्धाच्या ज्ञानमय, विज्ञानमय प्रकाशात आणले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात घडलेली ही अकल्पनीय अमुलाग्र क्रांती. म्हणूनच दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर उर भरून येणारा अभिमान आणि या महामानवाबद्दलची कृतज्ञता दिसते. युगानुयुगे शापित असलेल्या माणसांना एका क्षणात बुद्धाचे वरदान देणारे डॉ. बाबासाहेब म्हणूनच सर्वार्थाने महामानव ठरले.
६५ वे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून या महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपासकांची पाऊले दीक्षाभूमीकडे वळली. कोरोना महामारीच्या सावटामुळे मागील दोन वर्षापासून प्रेरणाभूमीचे दार बंद होते. आता कुठे परिस्थती सुधारत असल्याने हे दार उघडल्याने एक अलौकिक उत्साह अनुयायांमध्ये होता. मात्र सावट कायम असल्याने कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे आवश्यक असल्याने बहुतेकांनी घरूनच अभिवादन करण्याला प्राधान्य देत अनावश्यक गर्दी टाळली. त्यामुळे नेहमीपेक्षा केवळ १० टक्के लोकांनी हजेरी लावली असे म्हणता येईल. मात्र अनेकांनी उपस्थिती लावली.
दरम्यान सकाळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी दीक्षाभूमीवर महामानव डॉ. आंबेडकर, तथागत बुद्ध व पंचशील धम्मध्वजाला परेडसह मानवंदना दिली. त्यानंतर परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि निवडक भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेत बाबासाहेब व तथागताच्या अस्थिकलशाला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भन्ते नागदीपंकर, डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, आनंद फुलझेले, नामदेव सुटे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्राचार्य डॉ. भुनेश्वरी मेहेरे, डॉ. ए. पी. जोशी, समता सैनिक दलाचे कमांडर पृथ्वीराज मोटघरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. रवींद्र तिरपुडे, मधुकरराव मेश्राम, चंद्रहास सुटे आणि दीक्षाभूमी परिवारातील निवडक सदस्य उपस्थित होते. यानंतर दिवसभर अभिवादनाचा सिलसिला चालला होता. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश आणि दक्षिणेकडील अनुयायीसुद्धा पोहचले. सकाळपासून अतिशय शांततेत लोक अभिवादन करण्यासाठी पोहचत होते, जे रात्रीपर्यंत सुरू हाेते.
दुसरीकडे अनेक सामाजिक, धार्मिक संस्था, संघटनांनी संविधान चौक येथे पोहचून महामानवाला अभिवादन केले. तसेच शहरात सर्वत्र धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा झाला. वस्त्यावस्त्यामधील बाैद्ध विहारांमध्ये वंदना व धम्मदेसनासह विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले. त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण हाेते.
सकाळी तपासणीनंतर खुले-
दरम्यान काछीपुरा चौकात दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड लावून पोलिसांद्वारे येणाऱ्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस लावले की नाही, याची तपासणी केली जात होती. त्यामुळे अनुयायांमध्ये काहीसा राेश दिसून आला. अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे इतर ठिकाणची तुलना करून, दीक्षाभूमीवरच का, अशी निराशा व्यक्त केली जात हाेती. दुपारनंतर पाेलिसांनी बॅरिकेड उघडले.
अनुयायांनी घेतली-
दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी लसीकरणाची व्यवस्था आराेग्य विभागाकडून करण्यात आली हाेती. अनेक अनुयायांनी रांगेत लागून काेराेना प्रतिबंधक डाेस घेतला व आतमध्ये प्रवेश केला.
पुस्तके नसल्याची निराशा-
यावेळी पुस्तका व इतर जनसेवेचे स्टाॅल लावण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचे एकतरी पुस्तक घरी नेण्याची लालसा असलेल्यांची निराशा झाली. शिवाय भाेजनदान, आराेग्य तपासणी आदींचे स्टाॅल नसल्यानेही बाहेर गावच्या अनुयायांना थाेडासा त्रास सहन करावा लागला.