प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुम्ही दहा किमीचे अंतर सर्वसाधारण वेगाने ३० मिनिटात पार करता आणि अखेरचे पाव किंवा अर्धा किमी म्हणजेच ३०० ते ५०० मिटर अंतर पार करताना ३० मिनिटे लागत असतील तर तुमची स्थिती काय असेल? नेमक्या याच स्थितीचा सामना तुम्हाला धंतोली परिसरात राजरोस करावा लागतो. येथे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने आहेत. मोठमोठे रेस्टेराँ आहेत. रामदासपेठेप्रमाणेच येथे हॉस्पिटल्सची संख्याही मोठी आहे आणि त्यासाठी यशवंत स्टेडिमयच्या सभोवताल प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्थाही आहे. सोबतील रस्त्यांवर सिंगल कार-बाईक पार्किंग लेनही आहे. एवढे सगळे असताना अवैध पार्किंग होतेच. या सगळ्यात स्थानिक नागरिकांचा जीव गुदमरल्यासारखा होतो. शिवाय, आपल्या गंतव्यस्थळाच्या दरम्यान पडणाऱ्या या परिसरामुळे वाहकांना प्रचंड घामही फुटतो.
ग्राहकांसाठी प्राधान्यक्रम असलेला परिसर
हॉस्पिटल्स, इलेक्ट्रॉनिक मार्केट व रेस्टेराँमुळे हा भाग शहरातील सर्वात अतिव्यस्त परिसरांपैकी एक आहे. येथे सर्वच सुविधा उपलब्ध होत असल्याने रुग्ण असो वा इतर ग्राहक, सर्वांचाच प्राधान्य धंतोली परिसराला असतो. शिवाय, सीताबर्डी लागूनच आहे. त्यातच पश्चिम व पूर्व नागपूरला जोडणारी ही प्रमुख बाजारपेठ आहे. त्याचा परिणाम प्रत्येकाच्या मार्गात धंतोली ओलांडावीच लागते, असा अघोषित नियम आहे. त्यामुळे, येथे अतिप्रचंड वर्दळ असते.
संकेतांची होतेय धूळधाण
या भागात वेगवेगळ्या व्यवसायासंबंधित प्रतिष्ठाने, कार्यालये असल्याने आणि व्यंजनांची चवी असणारे सर्वच येत असतात. त्यामुळे, यशवंत स्टेडियमच्या सभाेवताली चारचाकी, दुचाकींची वैध पार्किंग व्यवस्था आहे. सोबतच स्टार बसची पार्किंगही याच भागात होते. त्यामुळे, या भागात किंवा वस्त्यांमधून येणाऱ्या काही प्रमुख मार्गांवर सिंगल लेन पार्किंग, एक दिवस रस्त्याच्या उजवीकडे तर दुसऱ्या दिवशी डावीकडे पार्किंगचे संकेत देणारे बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र, त्या संकेतांकडे दुर्लक्ष केले जाते.
* धंतोली पोलीस स्टेशन ते पंचशील चौक - साधारणत: ५०० मिटरचा हा रस्ता प्रचंड व्यस्ततेचा आहे. येथे सतत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. बस किंवा एखादे मोठे वाहन आले की चक्काजाम होतो.
* मेहाडीया चौक ते अभ्यंकर स्मारक ट्रस्ट चौक - हा साधारणत: ३०० मिटरचा रस्ता आहे. येथे विषम दिवस पार्किंगची व्यवस्था असतानाही, रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहने पार्क केली जातात. त्यामुळे, येथेही जाम लागतो.
* अभ्यंकर स्मारक ट्रस्ट चौक ते लोकमत चौक - या २०० मिटरच्या रस्त्यावर काही हॉस्पिटल्स आहेत. रस्ताही निमुळता आहे. शिवाय, रस्त्याच्या कडेला फळ, स्ट्रीट फूड विक्रेत्यांचे स्टॉल लागलेले असतात. चक्का जाम, हा रोजचाच विषय आहे.
* लोकमत चौक ते पंचशील चौक - धंतोलीला लागून असलेल्या या ३०० मिटरच्या वर्धा महामार्गावर इतस्तत: वाहने लागलेली असतात. येथे मोठमोठी औषधालये, हॉस्पिटल्सचे प्रमुख गेट आहेत. शिवाय, अन्य प्रतिष्ठानेही आहेत.
..........................