लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाशी राणी चौक, सीताबर्डी येथे सध्या उभी असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या संकु लात उभारण्यात येत असलेले धनवटे रंगमंदिर तयार होण्यास तब्बल २६ वर्षाचा काळ उलटला असला तरी, अद्याप उद्घाटनाचा मुहूर्त काही सापडत नसल्याचे दिसून येत आहे.धनवटे रंगमंदिर म्हणजे जुन्या पिढीसाठी स्मृतींचा खजिना आणि नव्या पिढीसाठी अदृश्य असा इतिहास. १९५२ सालापासून सुरू झालेल्या या रंगमंदिराचा डोलारा काहीच वर्षात उभा झाला. अनेक नाटके, संगीत नाटके, शास्त्रीय संगीताच्या मैफली, थोरामोठ्यांची व्याख्याने इथे रंगली. मात्र, १९९२-९३ साली तब्बल तीन-साडेतीन दशके दिमाखाने उभा असलेला हा आनंदी अभिव्यक्तीचा डोलारा नव्या व्यावसायिक ध्येयधोरणामुळे जमीनदोस्त झाला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी २९ डिसेंबर १९९३ रोजी नव्या वास्तूचा शिलान्यास केला आणि अवघ्या दोन वर्षात ही वास्तू आणि धनवटे रंगमंदिर पुन्हा डौलाने उभे राहील, असे आश्वासन दिले. मात्र, राजकीय आश्वासने दिवास्वप्ने असतात, हे त्याच वेळी सिद्ध झाले आणि तब्बल २६ वर्षे लोटली तरी अद्यापही ही वास्तू निर्माणाधीन आहे. विदर्भ साहित्य संघ सांस्कृतिक संकुलाचे पाच, सहा व सात मजले हे धनवटे रंगमंदिरासाठीचे आहेत. दोन वर्षापूर्वी याच निर्माणाधीन रंगमंदिरात विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनदिन सोहळा साजरा झाला होता. फिनिशिंग, खुर्च्यांची कामे, लायटिंगची कामे तेव्हा सुरू होती. तेव्हा लवकरच उद्घाटनाचा मुहूर्त जाहीर केला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, त्याही घटनेला दोन-अडीच वर्षे उलटून गेली. अद्याप वि.सा. संघाला उद्घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याचे दिसत आहे. काही शासकीय अटींची पूर्तता होणे बाकी असल्याच्या कारणाने, उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याचे सांगितले जात आहे.बरीच कामे अर्धवट अवस्थेतशिलान्यासाला २६ वर्षे लोटली आहेत. या संकुलाच्या बांधकामाचे कंत्राट शेवाळकर बिल्डर्सकडे देण्यात आले आहे. आराखड्यानुसार संकुलाचे खालचे तीन मजले व्यावसायिक धोरणासाठी तर वरचे चारही मजले विदर्भ साहित्य संघाच्या उपक्रमांसाठी आहेत. त्याअनुषंगाने वि.सा. संघाच्या जागेत कलादालन, ध्वनिमुद्रणाचा स्टुडिओ, कार्यालय तयार झाले आहेत. मात्र, सातव्या मजल्यावरील मुख्य रंगमंदिर, टेरेस गार्डन, अॅम्पी थिएटर अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत.घोषणाही गेली अन् नाट्य संमेलनही गेले२०१४ साली राज्यस्तरीय लेखिका संमेलनाच्या अनुषंगाने धनवटे रंगमंदिराचे लोकार्पण होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, ती घोषणा हवेतच विरली. त्यानंतर फेब्रुवारी २०१९ रोजी नागपुरात ९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन पार पडले. नाट्यवर्तुळात नाट्य संमेलनामध्येच धनवटे रंगमंदिराच्या वास्तूचे लोकार्पण व्हावे, अशी चर्चा निर्माण झाली होती. मात्र, कामे अपुरेच असल्याने आणि शासकीय कचेरीत कागदपत्रे अडकली असल्याने, शिवाय अनेक परवानग्यांची पूर्तता होऊ न शकल्याने, तोही मुहूर्त टळला.