लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोन चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी रविवारी रात्री धरमपेठ येथील रुफ नाईन या बारवर धाड टाकली. तेव्हा येथे अवैध हुक्का पार्लर व बार सुरू असल्याचे आढळून आले. येथून मोठ्या प्रमाणावर दारू व हुक्का जप्त करण्यात आला.पोलीस सूत्रानुसार रुफ नाईनचा मालक समीर शर्मा आहे. समीर हा परिसरातीलच लाहोरी बारशी संबंधित आहे. रुफ नाईनमध्ये अनेक दिवसांपासून अवैधपणे हुक्का पार्लर व बार चालविला जात होता. पोलिसांनाही याची माहिती होती. परंतु स्थानिक पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. गुन्हे शाखेने सुद्धा दोन-तीनदा कारवाई केली परंतु त्यांना यश आले नाही. रविवारी झोन चारचे उपायुक्त नीलेश भरणे हे नाईट राऊंडवर होते. त्यांना रुफ नाईनमध्ये अवैध बार व हुक्का पार्लर चालविला जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी रात्री १२ वाजता धाड टाकली. तेव्हा त्यांना मॅनेजर व वेटर ग्राहकांना हुक्का आणि दारू उपलब्ध करून देताना सापडले. हॉलमध्ये डीजेच्या तालावर ग्राहक नाचत होते. पोलिसांना पाहताच खळबळ उडाली. सीताबर्डी पोलीसही घटनास्थळी पोहोचले. बारची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर दारू आणि हुक्क्याचे साहित्य आढळून आले. जवळपास ४६,७०० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.सूत्रानुसार इमारतीच्या छतावर हुक्का पार्लर व बार अवैधपणे चालविले जात होते. स्थानिक नगरिकांनी याबाबत पोलिसांना अनेकदा तक्रारही केली. परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. समीरच्या कुटुंबीयांकडेच इमारतीचा बहुतांश भाग असल्याने कुणाला याचा विरोध करता आला नाही. ग्राहकांना जी दारू उपलब्ध करून दिली जात होती, ती जवळच्याच बारमधून उपलब्ध केली जात होती. ही बाब अबकारी विभागालाही माहिती होती. समीरने हा हुक्का पार्लर व बार अमरावतीच्या साहील मोटवानी नावाच्या युवकाला चालवण्यासाठी दिला होता. साहिल मॅनेजर सय्यद इफ्तेखारच्या मदतीने हा बार चालवित होता. सीताबर्डी पोलीस ठाण्यातील पीएसआय के.पी. राऊत यांच्या तक्रारीवर सय्यद इफ्तेखार, साहिल मोटवानी, प्रीती सिंह, लालसा पुनसे, वेटर अर्जुन पराडे, नवीन मेश्राम यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे पितळ उघडे पडलेशहरातील अवैध धंदे बंद झाल्याचा दावा शहर पोलीस करीत होते. परंतु या घटनेमुळे पोलिसांचा दावा खोटा ठरला आहे. पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. ज्या रुफ नाईनमध्ये अवैध बार व हुक्का पार्लर सुरू होता, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील खासगी घरापासून अगदी जवळ आहे. तीन महिन्यांपूर्वी याच परिसरातील सीए परांजपे यांच्या घरी चोरी झाली होती. ते आरोपी अजूनही सापडले नाही. दोन वर्षांपूर्वी परिसरातीलच लाहोरी बारसमोर गोळीबार झाला होता. यात समीर शर्मा आणि शेखू गँग सामील होती. या घटनानंतर धरमपेठ परिसरातील सुरक्षेला गांभीर्याने घेण्याची गरज होती. परंतु या घटनेनंतर तसे झाल्याचे दिसून येत नाही.धोक्यापासून सावध करण्यासाठी अलार्मधाड पडल्यास कारवाईपासून वाचण्यासाठी येथे चोख व्यवस्था करण्यात आली आहे. रुफ नाईनपर्यंत पोहोचण्यासाठी बेसमेंटमधून जावे लागते. इमारतीच्या मुख्य द्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. तिथे बाऊन्सर तैनात असतात. कुणीही संशयास्पद व्यक्ती दिसून आल्यास ’अलार्म’ वाजविला जातो. अलार्म वाजताच सर्व सावध होतात. उपायुक्त भरणे हे कारवाई करण्यासाठी जसे पोहोचले तसाच अलार्म वाजला. आरोपींनी दारूच्या बॉटल्स व हुक्का हटविणे सुरू केले.युवा जोडप्यांसाठी विशेष व्यवस्थासूत्रानुसार छतावर युवा जोडपी आणि कुटुंबीयांना बसण्यासाठी वेगवेगळ्या तंबूची व्यवस्था करण्यात आली होती. युवा जोडप्यांच्या ऐशोआरामाकडे विशेष लक्ष ठेवण्यात येत होते. त्यामुळे येथे नेहमीच युवा जोडप्यांची गर्दी दिसून येत होती. रविवारी करण्यात आलेल्या कारवाईच्या वेळीसुद्धा पोलिसांना १९ ग्राहक सापडले.डीसीपी भरणे यांनी फटकारलेमुंबईतील कमला मिल परिसरात झालेल्या भीषण अग्निकांडाच्या घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाद्वारे अवैध हॉटेल आणि बार विरुद्ध कारवाई होण्याची अपेक्षा केली जात होती. परंतु या कारवाईमुळे पोलीस व स्थानिक प्रशासन अजूनही कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून आले. रविवारी सीताबर्डी पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे उपायुक्त नीलेश भरणे यांनी पोलिसांना चांगले फटकारले. यानंतरच कारवाई झाली.
नागपुरातील धरमपेठ भागात हुक्का पार्लरवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 11:31 PM
झोन चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी रविवारी रात्री धरमपेठ येथील रुफ नाईन या बारवर धाड टाकली. तेव्हा येथे अवैध हुक्का पार्लर व बार सुरू असल्याचे आढळून आले. येथून मोठ्या प्रमाणावर दारू व हुक्का जप्त करण्यात आला.
ठळक मुद्देइमारतीच्या छतावर सुरू होता व्यवसाय : पोलीस-अबकारी विभागाचे संरक्षण