जयपूर : लोकमत समाचारचे जयपूर ब्यूरो चीफ धीरेंद्र जैन यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. कोरोना उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांच्या पत्नी कमलेश यांनाही कोरोना झाला आहे.
जैन राजस्थानमधील ज्येष्ठ पत्रकार होते. त्यांना सामाजिक प्रश्नांवरील लिखाणात रुची होती. लोकमत ग्रुपचे संस्थापक-संपादक आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा ‘बाबूजी'' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी राजस्थानमधील पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या पत्रकारिता पुरस्कार समितीचे ते सचिव होते. त्यांच्या पार्थिवावर आदर्शनगर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व लोकमत ग्रुपच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा हे सतत जैन यांच्या आरोग्याची माहिती घेत होते. गहलोत यांनी अत्यंत व्यस्त असतानाही जैन यांची तब्येत बरी होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी जैन यांच्या निधनामुळे पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. विजय दर्डा यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले की, धीरेंद्र जैन यांनी पत्रकारितेच्या मूल्यांचे आयुष्यभर पालन केले. त्यांनी नेहमी सामान्य व्यक्तींकरिता लिखाण केले. त्यांना लोकमत परिवाराच्या वतीने विनम्र आदरांजली.