अनिल अंबानींनी सांगितली आठवण : सभागृहाने केला टाळ्यांचा गजरनागपूर : पेट्रोल पंप आॅपरेटरपासून सुरुवात करणाऱ्या धीरूभाई अंबानींना सरकारी कामाची पद्धत माहीत होती. त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले नितीन गडकरी हे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे पूर्ण करू शकणार नाहीत हे गृहीत धरून धीरूभार्इंनी त्यांना प्रकल्प पूर्ण करून या, आपण पुन्हा भेटू, असे सांगितले होते. मात्र, गडकरी वेळेत प्रकल्प पूर्ण करून आले. त्यावेळी धीरूभाई म्हणाले, गडकरी तुम्ही जगातील पहिले व्यक्ती आहात ज्याने मला खोटं ठरवलं ! मी त्या घटनेचा साक्षीदार आहे, अशी आठवण अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे चेअरमन अनिल अंबानी यांनी सांगितली आणि सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. मिहानमध्ये उभारण्यात येणाऱ्या धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कचा भूहस्तांतरण सोहळा शुक्रवारी नागपुरात पार पडला. या वेळी अनिल अंबानी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. नागपूरचा उल्लेख ‘आॅरेंज सिटी‘ व ‘टायगर कॅपिटल आॅफ इंडिया’ असा करीत मी सध्या मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोन वाघांमध्ये बसलो असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या वेळी अनिल अंबानी यांनी १९९७-९८ सालची स्वत: अनुभवलेली एक आठवण सांगितली. ते म्हणाले, गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे च्या बांधकामाच्या वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी धीरूभाई अंबानी यांनी घरी निमंत्रित केले. त्यावेळी धीरूभाई व गडकरी यांच्यात बरीच चर्चा झाली. मी तरुण होतो. सर्व काही ऐकत होतो.शेवटी गडकरींनी हा प्रकल्प राज्य सरकारमार्फत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. गडकरींची दूरदृष्टी व आत्मविश्वास पाहून मी थक्क झालो. १९५८ साली पेट्रोल पंप आॅपरेटर म्हणून सुरुवात करणाऱ्या धीरूभार्इंच्या पाठीशी मोठा अनुभव होता. ते गडकरींना म्हणाले, ‘बोलण्यापेक्षा कृती ही जास्त प्रभावी असते. तुम्ही प्रकल्प पूर्ण करा, आपण नंतर पुन्हा भेटू’. सरकारी खाक्यात हा प्रकल्प पूर्ण होणार नाही व गडकरी पुन्हा कधीच भेटीला येणार नाही, हे धीरूभार्इंना अभिप्रेत होते. मात्र, गडकरींनी रेकॉर्ड वेळेत मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे पूर्ण केला. वडिलांनाही आश्चर्य वाटले. गडकरी प्रकल्प पूर्ण करून धीरूभार्इंना भेटायला आले. त्यावेळी धीरूभाई गडकरींना म्हणाले, ‘तुम्ही जगातील असे पहिले व्यक्ती आहात की ज्यांनी धीरूभार्इंना खोटे ठरविले.’ त्यांनी गडकरींना शाबासकी दिली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच धीरूभार्इंच्या तोंडून असे शब्द ऐकले होते, असे त्यांनी सांगितले. अनिल अंबानींनी सांगितलेली ही आठवण ऐकून गडकरींच्या सन्मानार्थ सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला. यानंतर गडकरी यांनीही धीरूभार्इंची एक आठवण सांगितली. गडकरी म्हणाले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन मुंबईत आले होते. तेव्हा मी व नारायण राणे विरोधी पक्षनेते होतो. धीरूभाई, विलासराव व बिल क्लिंटन बाजूला चहा पीत होते. धीरूभार्इंना मी दिसताच त्यांनी मला बोलवून घेतले व हे तेच मंत्री आहेत ज्यांनी मुंबईत उड्डाण पूल बनविले, ‘अ मॅन आॅफ ब्रिजेस’, असे सांगत माझी बिल क्लिंटनशी ओळख करून दिली. या वेळीही सभागृहाने टाळ्यांचा प्रतिसाद दिला. धीरूभाई आपल्याला तिसऱ्या मुलाप्रमाणे मानत होते, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
धीरूभाई म्हणाले, गडकरी तुम्ही मला खोटं ठरवलं !
By admin | Published: August 29, 2015 3:04 AM