लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी येथे दाखल झालेल्या भारतीय संघाने सोमवारी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित मैदानावर सरावाच्यावेळी चांगलाच घाम गाळला. यादरम्यान कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी महेंद्रसिंग धोनी यांनी हास्यविनोद करीत उपस्थित चाहत्यांना टाळ्यांचा गजर करायला भाग पाडले. सरावाच्या सुरुवातीस धोनीने हाताची मूठ आवळून माईकवर गाणे गात असल्याचे हावभाव केले. हे पाहून मागे राहील तो विराट कसला. त्यानेही गिटार वाजवित असल्याचे सांकेतिक दृश्य सादर करीत उपस्थित छायाचित्रकारांचे लक्ष वेधून घेतले होते.भारतीय संघ सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास जामठा स्टेडियममध्ये दाखल झाला. यावेळी धोनी संघासमवेत नव्हता. रविवारी रात्री गोव्याहून नागपुरात उशिरा पोहोचल्याने आजही तो हॉटेलमधून उशिरा मैदानात दाखल झाला. यादरम्यान कडक उन्हात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सराव झाला.फलंदाजीसाठी विराटसह दोन्ही सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातीला फटकेबाजी केली. रोहितने सरावादरम्यान काही आकर्षक कव्हर ड्राईव्ह मारले. त्याने मारलेला एक स्टेट ड्राईव्हचा फटका इतका कडक होता की कोच रवी शास्त्री स्फूर्ती दाखवत लगेच बाजूला झाले. हा चेंडू त्यांच्या शरीराजवळून गेला.वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी सरावात भाग घेतला नाही. चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव, लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी तब्बल दोन तास गोलंदाजी केली. मुख्य कोच शास्त्री यांच्यासह गोलंदाजी कोच भारत अरुण आणि फलंदाजी कोच संजय बांगर यांनी खेळाडूंना टीप्स दिल्या. शास्त्री यांनी प्रदीर्घ वेळ चहलसोबत चर्चा केली. कुलदीपला अरुणने काही टीप्स दिल्या. सरावानंतर चहलने लोकेश राहुल याच्यासोबत गप्पा करीत वेळ घालविला. रवींद्र जडेजाने मात्र गोलंदाजीच्या सरावानंतर फलंदाजीत हात आजमावला. त्याने विविध फटक्यांचा सराव करीत वेळ पडल्यास मी देखील मागे राहणार नाही, असे संकेत दिले.धोनी सरावाला उशिरा आला. त्याने आल्याआल्या संजय बांगर यांच्यासोबत चर्चा केली. नंतर पॅड घालून नेहमीच्या शैलीत दोन बॅट हातात घेऊन फलंदाजीसाठी नेट्सवर गेला. विदर्भाच्या अंडर १९ आणि २३ संघातील २२ युवा गोलंदाजांनी दोन्ही संघातील खेळाडूंना गोलंदाजी केली.नागपूर होणार ‘क्रिकेटमय’विश्वचषकाच्या उंबरठ्यावर भारत-ऑस्ट्रेलियाच्या या मालिकेला महत्त्व आले आहे. नागपुरच्या क्रिकेटप्रेमींमध्येदेखील या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मंगळवारी कामाचा दिवस असला तरी अनेक जणांनी ‘ग्रुप्स’मध्ये प्रत्यक्ष मैदानात जाऊन सामन्याचा आनंद लुटण्याचे ‘प्लॅनिंग’ केले आहे. परीक्षा तोंडावर असल्या तरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येदेखील सामन्याची ‘क्रेझ’ दिसून येत आहे. ‘सोशल मिडीया’वरदेखील नागपुरकर तरुणाई ‘क्रिकेटमय’ झाली होती. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी जामठा येथे क्रिकेटप्रेमी जमले होते. याशिवाय खेळाडू थांबलेल्या ‘हॉटेल’जवळदेखील ‘फॅन्स’ची गर्दी दिसून आली.