नागपूर : रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट, सुगंधी धूप, अगरबत्यांचा दरवळ, मंगलमयी वाद्यांची सुरावट आणि लक्ष वेधून घेणारी फुलांची सजावट अशा प्रसन्नशील चैतन्यदायी वातावरणात लाडक्या गणरायाचे शुक्रवारी आगमन होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी घरोघरी उत्साहाचे वातावरण असून, संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. प्रत्येकाला बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे वेध लागले आहेत; पण राज्य सरकारच्या नियमांतर्गत उत्सव साजरा करावा लागणार आहे.
सुख, शांती, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या विघ्नहर्ता श्री गणेशाचे शुक्रवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला आगमन होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज झाली असून, घरोघरी व गणेश मंडळांच्या सजावटीच्या तयारीने वेग घेतला आहे.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे घरगुती गणेशमूर्तीची उंची दोन फूट आणि सार्वजनिक गणेशमूर्ती चार फुटापेक्षा जास्त असू नये. चितार ओळीतील मूर्तिकारांनी नियमांचे पालन करीत मूर्ती एक, दोन आणि चार फूट उंच तयार केल्या आहेत. गणेशोत्सवानिमित्त पूजा साहित्य व सजावट साहित्य खरेदीसाठी आबालवृद्धांची मोठी गर्दी बाजारपेठेत दिसून येत आहे. अनेकांनी वाहतूक कोंडी टाळण्याकरिता उत्सवाच्या दोन दिवसांपूर्वी श्रींची मूर्ती घरी घेऊन जाण्यास पसंती दिली.
यंदाही ब्रॅण्ड, ढोलताशे, झांज पथके यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. मूर्तीची उंची कमी झाल्याने मूर्तिकार नाराज आहेत. त्यांना कमी किमतीत मूर्ती विकावी लागत आहे. याशिवाय सजावट साहित्याची विक्री करणाऱ्यांच्या व्यवसायात घसरण झाली आहे. कोरोनाच्या नियमांमुळे सर्वांचा उत्साह हिरावला आहे.