राजेश भोजेकर
चंद्रपूर : स्केटींगचा चिमुकला बादशहा साडेसात वर्षीय शिशिर उर्फ धु्रव सुभाष कामडीने मंगळवारी इंडिया बुक आॅफ रेकॉर्डही आता आपल्या नावे करून चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. इंडिया बूक आॅफ रेकॉर्डमध्ये असलेला पाच वर्षे जुना २१.१ कि.मी. स्पीड स्केटींग (फास्टेस्ट हॉल्फ स्केटींग मॅराथॉन) हा १ तास १२ मिनिटांचा विक्रम मोडीत काढून धु्रवने हे अंतर १ तास ५ मिनिट ५ सेकंदात गाठून तो आपल्या नावावर कोरला. पाच वर्षांपूर्वी एका मुलाने हा विक्रम नोंदविला होता. तो आता धु्रवच्या नावाने ओळखला जाणार आहे.
धु्रवने इंडिया बूक आॅफ रेकॉर्डमध्ये फास्टेस्ट हॉल्फ मॅराथॉनधील २१.१ कि.मी.चा रेकॉर्ड आपल्या नावे करावा, अशी इच्छा धु्रवची आई शिल्पा सुभाष कामडी बाळगून होत्या. या विक्रमाची ती साक्षदार व्हावी हे नियतीला मान्य नव्हते. ८ आॅगस्ट २०१७ रोजी धु्रवच्या आईचे निधन झाले. त्याच्या आईने मृत्यूपूर्वी इंडिया बूक आॅफ रेकॉर्डसाठी परवानगीचे सोपस्कार करून ठेवले होते. हा विक्रम आपल्या नावे करून आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा धु्रव बाळगून होता. धु्रवचे वडिल सुभाष कामडी यांनी उर्वरित सर्व सोपस्कार पार पाडले. अखेर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयतीदिनी हा दिवस उजळला. धुव्रने दाताळा रोड एमआयडीसी येथे हा विक्रम नोंदवला. यावेळी विक्रमाची नोंद घेण्यासाठी आलेल्या चमूने धु्रवचे कौतुक करताना ‘रस्ता सुरळीत असता, तर त्याने हा विक्रम १ तासाच्या आतच नोंदविला असता,’ अशी शाबासकीही दिली.