लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अॅक्युपंक्चर उपचाराद्वारे मधुमेह बरा करण्याची ग्वाही देऊन रुग्णाची फसवणूक करणारे मुंबई येथील डॉ. जयकुमार दीक्षित, त्यांचा मुलगा डॉ. स्वर्णिम व सून डॉ. पूनम यांच्यावर अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. या निर्णयामुळे तिघांनाही जोरदार दणका बसला.मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे व दीप्ती बोबडे यांनी हा निर्णय दिला. मनोहर खोरगडे असे तक्रारकर्त्या रुग्णाचे नाव असून, ते नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. पाच लाख रुपयांपैकी चार लाख रुपये सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे ग्राहक विधिसेवा निधीमध्ये जमा करण्यात यावे आणि एक लाख रुपये खोरगडे यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता देण्यात यावे, असे मंचने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे.डॉ. दीक्षित मधुमेहावर उपचार करण्यासाठी विविध शहरांमध्ये जात असतात. त्यांनी पोटात कोणतेही औषध न देता मधुमेह पूर्णपणे बरा करण्याची वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली होती. त्यामुळे खोरगडे दीक्षित यांच्याकडे गेले. खोरगडे यांनी सुमारे २३ महिने हा उपचार करून घेतला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. खोरगडे यांनी जाब विचारल्यावर पुढील उपचार नि:शुल्क करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर जवळपास दीड-दोन वर्षे त्यांच्यावर नि:शुल्क उपचार करण्यात आले, तरीही खोरगडे यांच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. प्रकृती एकदम बिघडल्यावर डॉ. दीक्षित यांनी त्यांना अॅलोपॅथीची औषधे दिली. त्यामुळे डॉ. दीक्षित यांचा खोटेपणा उघड झाल्याने खोरगडे यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली. दरम्यान, डॉक्टरने यावर उत्तर सादर केले. आमच्याकडील २४ टक्के रुग्ण बरे होतात. तक्रारकर्त्याने नियमित उपचार घेतले नाही. त्यामुळे त्यांना गुण आला नाही. वृत्तपत्रातील जाहिरात आपण दिली नव्हती, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता, हा निर्णय दिला.एका सुईचे एक हजार रुपयेखोरगडे यांनी आठ हजार रुपये भरून नोंदणी केली. कानाला सुई टोचून अॅक्युपंक्चर उपचाराद्वारे मधुमेह बरा करण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. महिन्यातून दोनदा सुई टोचायची होती व एक वेळ सुई टोचण्याचे त्यांच्याकडून एक हजार रुपये घेण्यात आले.