लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी पाच महिलेसह पाच पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. या रुग्णांसह नागपुरात बाधितांची संख्या ७३ झाली. धक्कादायक म्हणजे, पहिल्या कोरोना मृताकडून आतापर्यंत ४० पॉझिटिव्ह आले आहेत. यात त्यांचे नातेवाईक, शेजारी व नातेवाईकांच्या घरी काम करणाऱ्यांचा समावेश आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.नागपुरात पहिल्या कोरोनाबाधित ६८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. परंतु नमुन्याचा अहवाल येण्यास दोन दिवस लागले. त्यानंतर मृताचे नातेवाईक, शेजारी, यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची साखळी वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे, मृताची प्रवाशाची पार्श्वभूमी नसताना ते पॉझिटिव्ह आले होते. ही लागण त्यांचाच नातेवाईक ज्याचा ट्रव्हल्स एजन्सीचा व्यवसाय आहे त्याच्याकडून झाल्याचे सांगण्यात येते. हा एजंटही नऊ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. रविवारी पॉझिटिव्ह आलेले नऊ रुग्ण याच संपर्कातील आहे. यात १३, २९, ३३, ३५ व ३६ वर्षीय महिला तर १३, १५, ३३ व ३५ वर्षीय पुरुष आहे. यातील एक रुग्ण मोमीनपुºयातील तर चार रुग्ण शांतीनगर तर उर्वरीत रुग्ण हे सतरंजीपुºयातील आहेत. यांना काही दिवसांपूर्वी आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षात दाखल केले होते. दोन दिवसांपूर्वी यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले असता आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील चार रुग्णांना मेयो तर पाच रुग्णांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, शनिवारी मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल रविवारी सायंकाळी प्राप्त झाला. यात राजीवनगर कामठी रोडवरील ३२ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण आमदार निवासात क्वारंटाइन होता.
उपराजधानीत दिवसभरात १० ‘कोरोना’ बाधितांचे निदान; एकूण ७३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 9:18 PM