नागपूर : भारतात दरवर्षी १७ लाख बालकांचा मृत्यू होतो. यांतील जवळपास सहा लाख बालके अतिसारामुळे बळी पडतात. पाच वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूचे मुख्य कारण अतिसार आहे. यावर क्षार संजीवनी व झिंकचा उपचार दिल्यास बालमृत्यूंचे प्रमाण निश्चित कमी करता येऊ शकते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली.
‘अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स असोसिएशन’च्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात लहान मुलांमधील अतिसार या विषयावर तज्ज्ञँनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय धोटे, सचिव डॉ. पंकज अग्रवाल, उपाध्यक्ष डॉ. संजय पाखमोडे, सहसचिव डॉ. अर्चना जयस्वाल, मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आदी उपस्थित होते.
डॉ. धोटे म्हणाले, पाच वर्षांखालील मुलाला सुमारे दोन-तीन वेळा अतिसाराच्या आजाराला सामोरे जावे लागते. उपचार न झाल्यास गंभीर जलशुष्कतेमुळे धोका वाढतो. यावरील उपचारात झिंक हे अल्प प्रमाणात लागणारे खनिज आहे. जे शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्याकरिता गरजेचे ठरते. पेशीच्या वाढीमध्ये आणि प्रतिकार यंत्रणेच्या कार्यामध्येही याची भूमिका महत्त्वाची ठरते, असेही ते म्हणाले. डॉ. अग्रवाल म्हणाले, अतिसारावर क्षार संजीवनीसोबतच (ओआरएस) झिंक पुरेसे घेतल्यास जुलाबाचा कालावधी आणि तीव्रता कमी होते. अतिसाराची स्थिती सुधारते. झिंक हे अतिसाराच्या उपचारामध्ये रोखथामचे काम करते.
.... तर दोन महिने लागण होण्याची शक्यता कमी
डॉ. पाखमोडे म्हणाले, अतिसार झाल्यानंतर झिंक आणि क्षार संजीवनी १४ दिवसांपर्यंत दिल्यास पुढील दोन ते तीन महिन्यांपर्यंत अतिसाराची लागण होण्याची शक्यता कमी होते. डॉ. जयस्वाल म्हणाल्या, झिंकचे दुष्परिणाम सामान्य असले तरी ते देण्यापूर्वी बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
दीर्घ मुदतीच्या अतिसाराचे आरोग्यावर गंभीर परिणाम
डॉ. गावंडे म्हणाले, दीर्घ मुदतीच्या अतिसाराचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अपचनामुळे वारंवार जुलाब होण्यास सुरुवात होते, मात्र जंतुसंसर्ग, अन्नबाधा, अन्नविषबाधा आणि औषधाच्या अतिसेवनामुळेही अतिसार होतो. प्रतिजैविके आणि आम्लताविरोधी औषधांमुळे वारंवार जुलाब होतात. दीर्घ मुदतीचा अतिसार आणि लघुमुदतीचा अतिसार असे त्याचे दोन प्रकार ढोबळमानाने दिसून येतात.