नागपूर : देशावर हुकुमशाही आली आहे. संविधान मोडित काढण्याचे काम सुरू आहे. कोणी विरोधात बोलल्यास त्याच्या घरावर बुलडोझर नेत आहेत. न्यायालयाचे अधिकारही राज्यकर्त्यांनी हाती घेतले आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टीला केवळ सरकारच नव्हे तर व्यवस्थाही बदलण्याचे काम करायचे आहे, असे प्रतिपादन आपचे राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी केले.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आम आदमी पार्टीच्या विदर्भ विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रनिर्माण संकल्प सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार हरिभाऊ राठोड, आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, राज्य कोषाध्यक्ष जगजित सिंग, अशोक मिश्रा, विदर्भ प्रवक्ते संजय कोल्हे, नितीन गावडे, अंसार शेख उपस्थित होते. रंगा राचुरे म्हणाले, पंतप्रधानाच्या विरोधात बोलणे हे राष्ट्रद्रोह मानला जात आहे. शाळा शिकून नागरिक शिक्षित होतील आणि ते आपले ऐकणार नाहीत अशी केंद्र शासनाची विचारसरणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील १५ हजार शाळा बंद पाडण्यात येत आहेत. विदर्भात महापालिका आणि नगरपरिषदेत २०० जागा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. हरिभाऊ राठोड म्हणाले, मोदी सरकारला केजरीवालच टक्कर देऊ शकतात. केंद्र शासन आपचे खच्चीकरण करीत असून त्याचे पाप त्यांना फेडावे लागणार आहे. संचालन संयोजक कविता सिंघल यांनी केले. संकल्प सभेला विदर्भातून आलेले आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विदर्भाच चार महापालिका लढणार
- देवेंद्र वानखेडे यांनी आम आदमी पार्टी विदर्भात चार महानगरपालिकांच्या निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर करीत त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगितले. जगजित सिंग यांनी घरोघरी दिल्ली मॉडेल पोहोचविण्याचे आवाहन करून केंद्र शासनाच्या दडपशाहीने सत्ता मिळविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचे आवाहन केले. अंसार शेख यांनी कार्यकर्ते जोडून गावागावांत शाखा स्थापन करण्याचे आवाहन केले.
सिसोदियांच्या अटकेचा रेशीमबाग चौकात निषेध
- संकल्प सभा आटोपल्यानंतर आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केल्याच्या निषेधार्थ रेशीमबाग चौकात निषेध आंदोलन केले. या वेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करून आपला रोष व्यक्त केला. आंदोलनस्थळी तगडा पोलीस बंदोबस्त होता.
...........