चंद्रपूर पोलिसांनी प्राण्यांविरुद्ध एफआयआर नोंदवले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 11:15 PM2021-07-29T23:15:00+5:302021-07-29T23:15:27+5:30
Humam wildlife conflict वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यामुळे झालेल्या मानव मृत्यू प्रकरणांत चंद्रपूर पोलिसांनी ५४ एफआयआर नोंदवले आहेत. हे एफआयआर प्राण्यांविरुद्ध नोंदवण्यात आले का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर पोलीस अधीक्षकांना करून यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यामुळे झालेल्या मानव मृत्यू प्रकरणांत चंद्रपूर पोलिसांनी ५४ एफआयआर नोंदवले आहेत. हे एफआयआर प्राण्यांविरुद्ध नोंदवण्यात आले का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर पोलीस अधीक्षकांना करून यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात रेड लिंक्स कॉन्फडरेशनच्या संचालक संगीता डोगरा यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या मानव मृत्यू प्रकरणांत पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती डाेगरा यांनी चंद्रपूर पोलिसांना मागितली होती. १४ जून २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना या प्रकरणांत ५४ एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती दिली. हे एफआयआर कुणाविरुद्ध नोंदवण्यात आले, याविषयी काहीच स्पष्ट केले नाही. डोगरा यांनी याकडे लक्ष वेधले असता, उच्च न्यायालयाने चंद्रपूर पोलिसांच्या या उत्तरावर आश्चर्य व्यक्त केले. कायद्यानुसार प्राण्यांविरुद्ध एफआयआर नोंदवता येत नाही. मग पोलिसांनी कुणाविरुद्ध एफआयआर नोंदवले, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त करून चंद्रपूर पोलीस अधीक्षकांना यावर स्पष्टीकरण मागितले. ॲड. झिशान हक यांनी न्यायालय मित्र म्हणून, ॲड. कार्तिक शुकुल यांनी वन विभाग तर, ॲड. निवेदिता मेहता यांनी सरकारतर्फे कामकाज पाहिले.