स्वच्छ भारत अभियानाचा नागपूर मनपाला विसर पडला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:11 AM2019-08-29T11:11:13+5:302019-08-29T11:13:03+5:30
नागपूर महापालिकेला स्वच्छ भारत अभियानाचा विसर पडला का? अशी विचारणा न्यायालयाने केली. तसेच, बाजारांमधील समस्या दोन आठवड्यात दूर कराव्या असा आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बाजारांतील अस्वच्छता व अन्य विविध समस्यांवरून महापालिकेला फटकारले. महापालिकेला स्वच्छ भारत अभियानाचा विसर पडला का? अशी विचारणा न्यायालयाने केली. तसेच, बाजारांमधील समस्या दोन आठवड्यात दूर कराव्या असा आदेश दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१५ मध्ये न्यायालयाने वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली व याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. शशिभूषण वाहाणे यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अॅड. वाहाणे यांनी बाजारांची दुरवस्था दाखविणारी छायाचित्रे न्यायालयात सादर केली. तसेच, यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात यावेत अशी विनंती केली. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. पावसामुळे शहरातील कॉटन मार्केट, सक्करदरा बाजार, मंगळवारी बाजार, नेताजी मार्केट, गोकुलपेठ बाजार यासह विविध बाजारांत सर्वत्र घाण पसरली आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. खराब भाजीपाला मोकळ्या जागेवर फेकण्यात येत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बाजारांची नियमित सफाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.