लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर् : अंड्याची भाजी करून देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या संशयखोर पतीने आपल्या पत्नी आणि सासूवर प्राणघातक हल्ला केला. यात मायलेकी दोघीही गंभीर जखमी झाल्या. श्रीकृष्णनगर मानकापूर येथे गुरुवारी रात्री ही थरारक घटना घडली.
वर्षा दिलीप बुकणे (वय ४१) आणि कासाबाई शेगोजी खेवले (वय ७३) अशी जखमी मायलेकीची नावे आहेत. आरोपीचे नाव दिलीप बाबुरावजी बुकणे (वय ५२) आहे. तो प्रारंभी डीजेचे काम करायचा. लॉकडाऊनमुळे तो बेरोजगार झाला. २० वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला असून त्यांना १८ वर्षांचा मोठा मुलगा आहे.आरोपी दिलीप व्यसनी आणि संशयखोर आहे. पत्नी वर्षा वीज मंडळात नोकरीला आहे. अनेकदा कार्यालयातून यायला उशीर होत असल्याने दिलीप पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालतो. त्याच्या नेहमीच्या कटकटीला कंटाळून वर्षा तिच्या वृद्ध आईकडे राहायला आली.तेथेही आरोपी दिलीप येतो आणि त्रास देतो. या पार्श्वभूमीवर, गुुरूवारी रात्री ७ च्या सुमारास वर्षा आणि तिची आई कासाबाई या दोघी भाजी निवडत असताना आरोपी दिलीप अंडे घेऊन आला. त्याने पत्नीला अंड्याची भाजी तातडीने बनविण्याचे फर्मान सोडले.तिने गुरुवार असल्याने भाजी बनविण्यास नकार दिला. त्यावरून दिलीपने वाद घालायला सुरुवात केली. वर्षाच्या चारित्र्यावर संशय घेत तो तिला नको ते बोलू लागला. तिने विरोध करताच आरोपीने घरात ठेवलेली मुलाच्या क्रिकेटची बॅट उचलली आणि पत्नी वर्षाला मारू लागला. ते पाहून वृद्ध कासाबाई वर्षाच्या मदतीला धावली. आरोपीने वृद्ध सासूच्या डोक्यावरही बॅटचे फटके मारले. त्यामुळे मायलेकी गंभीर जखमी झाल्या. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यांनी आरोपी दिलीपला आवरले. मानकापूर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीला पीसीआर
जखमी मायलेकी खासगी इस्पितळात दाखल असून वृद्ध कासाबाईची प्रकृती गंभीर आहे. आरोपी दिलीपला हत्या करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर करून चार दिवसाचा पीसीआर मिळविण्यात आल्याची माहिती मानकापूरचे ठाणेदार गणेश ठाकरे यांनी दिली.