पकोडे विकण्यासाठी शिक्षण घेतले का? काँग्रेस नेत्यांचा भाजपा सरकारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 10:00 AM2018-04-02T10:00:31+5:302018-04-02T10:00:41+5:30

युवक काँग्रेस, एनएसयुआयतर्फे रविवारी वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला.

Did we learn to sell pakora? Congress leaders question to BJP government | पकोडे विकण्यासाठी शिक्षण घेतले का? काँग्रेस नेत्यांचा भाजपा सरकारला सवाल

पकोडे विकण्यासाठी शिक्षण घेतले का? काँग्रेस नेत्यांचा भाजपा सरकारला सवाल

Next
ठळक मुद्देबेरोजगारांचा एल्गार मोर्चा धडकलामोर्चात युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता.आंदोलकांनी ‘मी पदवीधर, मी बेरोजगार’ अशा टोप्या घातल्या होत्या.युवक ‘मल्ल्या- मोदी, झाले गुल, युवकांना बनविले एप्रिल फूल’, असे फलक घेऊन सहभागी झाले होते.कार्यकर्ते ‘पकोडे’ विकून मोदी सरकारचा निषेध नोंदवित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी युवकांना तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यशवंत स्डेडियमवर जाहीर सभा घेत ५० लाख युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात युवकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. युवकांनी लाखो रुपये खर्च करून, दिवस-रात्र अभ्यास करून पदव्या घेतल्या, त्या पकोडे विकण्यासाठी का, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारला केला. सरकारकडून फसवणूक झालेले हे संतप्त बेरोजगार युवकच सरकारला खाली खेचतील, असा इशाराही यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिला.
युवक काँग्रेस, एनएसयुआयतर्फे रविवारी वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून कडाक्याच्या उन्हात निघालेला मोर्चा यशवंत स्डेडियमवर पोहोचला. मोर्चात अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव अविनाश पांडे, अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघुवंशी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके, कुंदा राऊत, रामटेक लोकसभा अध्यक्ष अनिल राय, एनएसयुआयचे अध्यक्ष अमीन नूरी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी आ. अशोक धवड, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, जि.प.चे विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांच्यासह मोठ्या संख्येने शहर व ग्रामीणमधून आलेले युवक, पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले.
यशवंत स्डेडियम परिसरात झालेल्या जाहीर सभेत नितीन राऊत म्हणाले, मोदी व गडकरी यांनी युवकांना नोकऱ्या देण्याचे स्वप्न दाखविले.
चार वर्षे निघून गेली तरी स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. सरकारने किती नोकऱ्या दिल्या याचा हिशेब सादर करण्याची मागणी त्यांनी केली. भारत युवकांचा देश आहे. येथे युवकांच्या हातालाच काम मिळत नसेल तर तेच हात सत्ता उलथवून फेकण्यासाठी ताकद लावतील, असा इशाराही त्यांनी दिला. अविनाश पांडे म्हणाले, युवकांच्या शिक्षणावर पालकांनी कर्ज काढून लाखो रुपये खर्च केले आहेत. मुलाला नोकरी लागली की कर्ज फेडू, अशी आई-वडिलांना आशा होती. मात्र, चार वर्षात केंद्र व राज्य सरकारने काहीच न केल्यामुळे तीसुद्धा संपली आहे.
सरकारने युवक कल्याणाच्या योजना बंद केल्याचा आरोप करीत आता हे युवकच भाजपाला बुरे दिन दाखवतील, असा इशारा त्यांनी दिला. नाना पटोले यांनी युवकांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. अनिस अहमद यांनी बेरोजगारी वाढण्यासाठी सरकारची धोरणे जबाबदार असल्याची टीका केली. राजेंद्र मुळक यांनी नोकऱ्याच द्यायच्या नसतील तर शिक्षणावरील एवढा खर्च युवकांनी कशासाठी केला, असा सवाल सरकारला केला.
प्रफुल्ल गुडधे म्हणाले, मिहान व मेट्रो रेल्वेच्या नावावर युवकांना स्वप्न दाखविले गेले. प्रत्यक्षात नोकऱ्या मिळाल्या नाही. आता युवक जागा झाला असून सत्ताधाऱ्यांनी एल्गार मोर्चाची धडकी घेतली आहे. युवकांना गुंतवून ठेवण्यासाठी ‘खेलो नागपूर खेलो’ चे सल्ले दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बंटी शेळके यांनी पंतप्रधान मोदी यांनी युवकांची फसवणूक केल्याचा आरोप करीत १ एप्रिल हा ‘राष्ट्रीय फेकू दिवस’ म्हणून जाहीर करण्याची मागणी केली. मोर्चात अभिजित सपकाळ, रवींद्र दरेकर, अतुल कोटेचा, शकुर नागानी, किशोर जिचकार, मनोज सांगोळे, नरेंद्र जिचकार, नितीन कुंभलकर, संजय दुबे, कमलेश समर्थ, प्रकाश वसु, वैभव घोंगे,आदी उपस्थित होेते.

मुत्तेमवार -ठाकरे गट दूरच
शहर काँग्रेसतर्फे आयोजित कुठल्याही आंदोलनात चतुर्वेदी-राऊत गटाचे कार्यकर्ते सहभागी होत नव्हते. रविवारी झालेल्या मोर्चात मुत्तेमवार- ठाकरे गटाने ही परंपरा पुढे नेली. एल्गार मोर्चासाठी राऊत, अहमद, गुडधे यांनी युवक काँग्रेसला समोर करीत पडद्यामागून ताकद उभी केली होती. त्यामुळे मुत्तेमवार- ठाकरे गटाचे कार्यकर्ते या मोर्चाकडे फिरकले नाहीत. नगरसेवक हरीश ग्वालबन्शी यांचा अपवाद वगळता मुत्तेमवार- ठाकरे समर्थकांनी मोर्चापासून दूर राहणेच पसंत केले.

Web Title: Did we learn to sell pakora? Congress leaders question to BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.