नागपूर : भूमिहिन शेतकऱ्यांना शेतजमीन देऊन त्यांना भूमालक केल्यावर त्यांच्या जीवनमानात काही बदल झाला आहे का याची माहिती घेण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. सांख्यिकी विभागाकडून जिल्ह्यातील तीन तालुक्यात यासंदर्भात सर्वेक्षण केले जात आहे.काहींकडे शकडो एकर जमीन तर काहींच्या वाट्याला कायम शेतमजुरी अशी स्थिती पूर्वी राज्यात होती. १९६१ मध्ये राज्यात कायदा करून व्यक्तिगत पातळीवर कोणाकडे किती शेतजमीन असावी यावर मर्यादा घालण्यात आल्या. त्यानुसार कोरडवाहूसाठी ५४ एकरची मर्यादा होती तर ओलित जमिनीसाठी विभागनिहाय वेगवेगळ्या मर्यादा होत्या. या मर्यादेबाहेर ज्यांच्याकडे अधिक शेती होती ती त्यांच्याकडून काढून घेऊन ती शासनाने भूमिहिनांना देऊन त्यांना शेतमालक करण्याचा उद्देश होता. त्यानुसार प्रत्येक गावागावातील भूमिहिनांना शासनाच्या या योजनेतून जमीन देण्यात आली. यासोबतच शेतीयोग्य सरकारी जमिनींचेही भूमिहिनांना वाटप करण्यात आले होते. यामुळे शेतमजूर शेतमालक झाले. सध्या त्यांच्या जीवनमानाची स्थिती काय आहे, त्यात काही बदल झाला का हे जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील उमरेड, रामटेक व काटोल या तीन तालुक्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या माहितीचा वापर केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी केला जातो हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)
शेत जमीन दिल्यावर जीवनमान बदलले का?
By admin | Published: May 11, 2015 2:20 AM