लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी आदी दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध असल्याने लोकांची खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे. यादरम्यान अनेकजण मास्कचा उपयोग करीत नाहीत. त्यामुळे कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. काही नागरिक काम नसतानाही फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. कोरोनाने मरेन पण गावभर फिरेन, असे काहीसे चित्र दिसून येत आहे.
नागपुरातील इतवारी, मस्कासाथ, गोळीबार चौक, गांधीबाग, सक्करदरा, नंदनवन या परिसराची पाहणी केली असता या भागातील दुकानांमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. इतवारी ठोक किराणा बाजारात सकाळी ७ वाजेपासून किरकोळ किराणा दुकानदार आणि नागरिक खरेदीसाठी येतात. हीच स्थिती शहरातील विविध भागातील किराणा दुकानांची आहे. आधी वस्तू मिळाव्यात म्हणून नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही. याशिवाय दूध डेअरी व बेकरींमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळते. दुकाने ११ वाजता बंद होत असल्याने लोक खरेदीसाठी तुटून पडतात. यावेळी सर्वजण मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत नाहीत. याकडे प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांसह दुकानदारही बेफिकिरीने वागत आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊनचे नवे संकट उभे ठाकले आहे. लॉकडाऊन प्रशासन आणि सामान्य नागरिकांपैकी कुणालाही परवडणारे नसल्याने नागरिकांनी मास्क व सामाजिक दुराव्याचे पालन करणे हा एकमेव उपाय आहे.
भाजी बाजारात खरेदीसाठी गर्दी
सकाळी सक्करदरा, रमणा मारोती व नंदनवन परिसरातील भाजी बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विक्रेत्यांनीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता जवळजवळ दुकाने थाटली होती. त्यामुळे विक्रेत्यांकडे जास्त गर्दी होती. अशा गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता दिसून आली. अशावेळी विक्रेत्यांना सांगायला मनपाचे कर्मचारी येत नाहीत. ११ वाजले की पोलीस दुकाने बंद करण्यासाठी फेऱ्या मारतात. एवढेच काम पोलीस करतात. प्रशासनाने लॉकडाऊन तर लावले, पण नियमांचे पालन आणि लोकांना शिस्त लावायला कुणीही पुढे येत नाहीत. शासकीय यंत्रणाही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आणि व्यापारी, व्यावसायिकांचे नुकसान टाळण्यासाठीच उपाययोजना करीत आहे. पण, नागरिकांना त्याचे महत्त्व कळत नसल्याचे दिसून येत आहे.
कळमना व कॉटन मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन
कळमना व कॉटन मार्केट भाजी बाजारात सकाळी दररोज शेकडो ग्राहक आणि किरकोळ विक्रेते येतात. गर्दीमुळे कळमना बाजारात लॉकडाऊन असल्याचे दिसून येत नाही. या बाजारात सकाळी जवळपास ५ ते ६ हजार लोक एकत्र असतात. या बाजारातून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत. कळमन्यात प्रशासक केबिनबाहेर पडत नसल्याने गर्दीवर कोण नियंत्रण मिळविणार, हा गंभीर प्रश्न आहे. हीच स्थिती फळे बाजाराची आहे. फळांच्या लिलावादरम्यान शेकडो ग्राहक व व्यापाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करीत नेहमीच्या सवयीनुसार वागत आहेत. कळमना बाजार १५ दिवसांसाठी बंद करावा, अशी मागणी अडतिया आणि व्यापाऱ्यांची आहे.