लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रेल्वेत आधुनिकीकरणाला गती देण्यात येत आहे. नवनवे तंत्रज्ञान आणून रेल्वेचा विकास साधण्यात येत आहे. पूर्वी वाफेच्या शक्तीवर धावणारे इंजिन काळाच्या पडद्याआड गेले. त्यानंतर डिझेल इंजिन रेल्वेच्या सेवेत आले. परंतु आता डिझेलचे इंजिनही इतिहासजमा होणार असून सर्वत्र विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत. नागपूर विभागात ९० टक्के विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. विभागात केवळ ११ डिझेलचे इंजिन उरले असून आगामी काळात हे इंजिनही पहावयास मिळणार नाही.डिझेल इंजिनमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होतो. डिझेल इंजिनमुळे पैसा आणि वेळही खर्ची होतो. त्यामुळे भारतीय रेल्वेत विद्युतीकरणाची कामे झपाट्याने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात केवळ ११ डिझेल इंजिन उरले आहेत. विभागातील बहुतांश मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पिंपळकुटी, आदिलाबाद आणि वणी भागात विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे आटोपल्यानंतर या मार्गावरील रेल्वेगाड्याही विजेवर धावणार आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने डिझेल इंजिनचा वापर कमी होऊन ते बंद होणार आहे. विद्युतीकरण झाल्यानंतर डिझेल इंजिनचा वापर कमी होणार असला तरी ते कायमचे बंद होणार नाही. वीज पुरवठा खंडित झाल्यास डिझेल इंजिनशिवाय पर्याय नसल्यामुळे हे डिझेल इंजिन अडचणीच्या काळात आपली सेवा देतील. डोंगराळ भागात अजूनही रेल्वेत डिझेलच्या इंजिनचा वापर करण्यात येतो. परंतु विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर डिझेल इंजिन क्वचितच दृष्टीस पडणार आहे.आपात्कालीन स्थितीतच डिझेल इंजिनचा वापरमध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ९० टक्के विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. वणी, पिंपळकुटी, आदिलाबाद या भागात युद्ध पातळीवर विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. त्यानंतर डिझेल इंजिनचा वापर कमी होणार आहे. परंतु वीज पुरवठा खंडित झाल्यास डिझेल इंजिनचा वापर करावा लागणार आहे.’एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग