प्रवासी त्रस्त : तळेगावात अडकल्या अनेक बसेस नागपूर : दीपावलीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ५० अतिरिक्त बसेस चालवित आहे. पुणेसाठी चालविण्यात येणाऱ्या या गाड्याना मात्र डिझेलच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. डिझेल अभावी तळेगाव येथे अनेक बसेस अडकून पडल्या आहेत. पुणेसाठी एसटी बसेसमध्ये १६० लिटर डिझेल लागते. मार्गात पडणाऱ्या एसटी डेपोतील डिझेल पंपावरून या गाड्यांमध्ये डिझेल भरले जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. एसटीच्या विभागीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणेसाठी विशेष बस सुरू केल्यापासूनच ही टंचाई निर्माण झाली आहे. एसटीतर्फे सण, उत्सवादरम्यान विशेष बसेस सोडल्या जातात. परंतु सुविधांकडे मात्र लक्ष दिले जात नाही. डेपोवाले डिझेलसाठी पत्र आणण्यास सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यासाठी निघालेली बस क्र. ८९३२ डिझेलअभावी तळेगाव येथे अडकून पडली. तिला ११.३० वाजता पुण्याला पोहोचायचे होते. मात्र ती ४.३० वाजता पोहोचली. ‘प्रवासी आमचे दैवत’ हा एसटीचा स्लोगन आहे. परंतु एसटीच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना विलंबाचा त्रास सोसावा लागत आहे. (प्रतिनिधी)
एसटीत डिझेलची टंचाई
By admin | Published: October 23, 2014 12:28 AM