आनंद डेकाटे
नागपूर : ‘बार्टी’ ही संस्था मागील कित्येक वर्षांपासून संशोधन व प्रशिक्षणाचे कार्य करीत आहे; परंतु भटके विमुक्त व ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’ने अवघ्या सव्वावर्षात जे करून दाखविले, त्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. दर्जेदार शैक्षणिक प्रशिक्षणासह रोजगार निर्मितीसाठी जे महाज्योतीने करून दाखविले ते अनेक वर्षांपासून बार्टीला का जमले नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
यूपीएससी, एमपीएससी विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्याचे कार्य बार्टी अनेक वर्षांपासून करीत आहे. महाज्योतीने यापुढे जात यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीतील नामवंत प्रशिक्षण संस्थेमार्फत ८३० उमेदवारांना मुख्य परीक्षेपर्यंत ऑनलाइन प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. परीक्षेच्या नोंदणीकृत उमेदवारांना मोफत टॅब व दररोज ६ जीबी डेटा दिला. यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी एकरकमी प्रत्येकी २५ हजार रुपयापर्यंत अर्थसाहाय्याची तरतूदही आहे.
संशोधन शिष्यवृत्तीअंतर्गत पीएच.डी.साठी ६३१ उमेदवारांची, तर एमफिलच्या ७३ उमेदवारांची निवड करण्यात आली. बार्टी मात्र एका वर्षी केवळ २०० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती प्रदान करते. महाज्योतीने सीए, सीएस व बँकिंगच्या प्रशिक्षणासह कमर्शिअल पायलटचेही प्रशिक्षण सुरू केले आहे. औरंगाबाद येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक प्रोसेसिंग (सिपेट) या नामवंत प्रशिक्षण संस्थेमार्फत मशीन ऑपरेटर टूल रूम, टेक्निशियन, टेक्निकल सपोर्ट, जनरल ड्युटी असिस्टंट आदी कोर्सेसचे ४५०० उमेदवारांना प्रशिक्षण दिले जात आहे. जेईई, नीट, एसएच-सीईटी परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी महाज्योतीने नागपूर कार्यालयात ४ अद्ययावत स्टुडिओ उभारले असून, अनुभवी लोकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे.
बार्टीने ‘सी-डॅक’चे प्रशिक्षण केले बंद
बार्टीतर्फे ‘सी-डॅक’चे प्रशिक्षण दिले जात हाेते. यात आयटी क्षेत्रातील मुलांना हमखास रोजगार मिळत होता. २०१५, २०१६ व २०१७ साली अनेक मुलांना रोजगार मिळाला; परंतु बार्टीने याचे प्रशिक्षण बंद केले. विदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलांनासुद्धा प्रशिक्षण दिले जात होते तेही बंद केले.
सारथी व महाज्योतीतर्फे विदेशी शिष्यवृत्तीसाठी प्रत्येकी हजारापर्यंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. महाज्योती नवनवीन प्रशिक्षण देत आहे. रोजगार निर्मितीचा प्रयोग करीत आहे. बार्टी केवळ वर्षाला २०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. त्यातही विविध अडथळे आणले जातात. परीक्षा घेतली जाते.
- अतुल खोब्रागडे, डॉ. आंबेडकर स्टुडंट असोसिएशन.