लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असताना पालकमंत्र्यांसह अन्य मंत्री नागपूरसह राज्यात लॉकडाऊनचे संकेत देत आहेत. पालकमंत्री नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात वेळेच्या निर्बंधांसह संभाव्य लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनंतर विविध बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली असून, किरकोळ व्यापाऱ्यांनी ऑर्डर्स रद्द केल्या असून त्यामुळे होलसेल व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. व्यवसायाची प्रक्रिया थांबल्याचा आरोप नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आश्विन मेहाडिया यांनी बुधवारी पत्र परिषदेत केला. (The different announcements of the two ministers created a stir in the markets of Nagpur)
रुग्ण वाढ नाही, मग बंधने कशाला?
मेहाडिया म्हणाले, मंत्र्यांनी व्यापारी संघटनांशी चर्चा करूनच घोषणा कराव्यात; पण सध्या नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीच्या घटना नसतानाही नितीन राऊत यांनी वेळेच्या निर्बंधाची संभाव्य घोषणा केली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. रुग्ण वाढले तर लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध नाही; पण अनावश्यक घोषणा करून मंत्री व्यापाऱ्यांना संकटात टाकत आहेत. व्यापाऱ्यांवर पूर्वीच कर्जाचा बोजा आहे आणि त्यातच या घोषणेने ते संकटात आले आहेत. गेल्यावेळी रुग्णसंख्या हजारावर गेल्यानंतर लॉकडाऊन लावले होते; पण आता रुग्णसंख्या दोन असताना वेळेचे निर्बंध का, असा सवाल मेहाडिया यांनी केला.
इन्स्पेक्टर राज येणार
बाजारपेठेत सर्वांचे दोन डोस झाले आहेत. दुकानदार मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेत आहेत. मंत्र्यांच्या निर्णयामुळे इन्स्पेक्टर राज येणार आहे. मनपाचे पथक केव्हाही येऊन दुकानदारांना दंड ठोठावणार आहे. अनेक नेते, अधिकारी व कर्मचारी मास्क घालत नाहीत. त्यांच्यावर दंड का ठोठावत नाही, असा सवाल मेहाडिया यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप, विदर्भाकडे कानाडोळा
नागपूर लेव्हल-१ मध्ये असतानाही राज्य सरकारने नागपूरला अडीच महिने वेळेच्या बंधनात ठेवले. तेव्हा पालकमंत्री काहीच बोलले नाहीत. या उलट पश्चिम महाराष्ट्रात सर्व दुकाने पूर्णवेळ सुरू होती. राज्यकर्ते विदर्भाकडे कानाडोळा करून अन्याय करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-तर व्यापारी स्वत:च दुकाने बंद करतील
रूग्ण वाढू लागताच व्यापारी स्वत:च दुकाने बंद करतील. त्यावेळी वेळेचे निर्बंध लादल्यास व्यापारी विरोध करणार नाही; पण अनावश्यक निर्बंध लादल्यास व्यापारी विरोध करतील आणि आंदोलनाचा मार्गही पत्करतील. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत ते आधी सांगावे. व्यापारी नेहमीच सरकारसोबत आहोत, असेही ते म्हणाले.