नागपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १२७५ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाटपात अडचण आली आहे. या विद्यार्थ्यांचे आधार बँकेशी लिंक नसल्याने शिष्यवृत्तीचे वाटप करण्यास विभाग हतबल ठरतो आहे.
विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातील १२७५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसल्याचे दिसून आले. शैक्षणिक सत्र २०२०-२१ करिता शिष्यवृत्ती व फ्रिशिप अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता तसेच २०१९-२० करिता महाविद्यालयाच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाची कागदपत्रे तपासून पात्र अर्ज कार्यालयाच्या लॉगिनवर मंजुरीस पाठविण्याकरिता महाडीबीटी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी जसे शिष्यवृत्तीसाठी दुर्लक्ष केले तसेच महाविद्यालयांचेही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे आधार बँक खात्याशी अपडेट करण्याकरिता त्यांच्या स्तरावर कॅम्प घेणे गरजेचे होते. तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवश्यक कागदपत्रे तपासून पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प कार्यालयाच्या लॉगिनवर मंजुरीकरिता पाठविले नाही. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी संलग्न करून व शिष्यवृत्तीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी विभागाने मुदत दिली आहे. दिलेल्या मुदतीत प्रस्ताव पोर्टलवर सादर न केल्यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहे. विभागाने त्याला विद्यार्थी व महाविद्यालयच जबाबदार राहील, अशी नोंद घेण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे व मागील वर्षातील अर्जाचे नूतनीकरण करण्याकरिता प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांनी महाविद्यालय व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.