लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मालमत्ता सर्वेक्षणात सायबरटेक कंपनीने घोळ घातल्याने टॅक्स वसुलीला फटका बसला आहे. याची जाणीव असतानाही आता शहरातील झाडांची गणना करण्यासाठी महापालिकेचा उद्यान विभाग खासगी एजन्सीची नियुक्ती करणार आहे. परंतु उद्यान विभागातील मंजूर २७३ पदांपैकी जेमतेम ६५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातच शहरातील ९५ उद्यानांची देखरेख करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. झाडांची गणना करण्याचे काम खासगी संस्थेकडे दिले तरी या संस्थेच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी विभागाकडे कर्मचारी नाहीत. यामुळे झाडांची गणना अडचणीत आली आहे.डिसेंबरअखेरीस शहरातील झाडांची गणना केली जाणार आहे. यात वृक्ष निरीक्षक व सहायक वृक्ष निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु ही पदे रिक्त आहेत. सभागृहाच्या मंजुरीनंतर रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. शासन मंजुरीनंतरच ही पदे भरली जातील, अशी माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.दर आठवड्याला महापालिकेतून ४० ते ५० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. परंतु रिक्त जागांवर मागील काही वर्षांत भरती करण्यात आलेली नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त पदाचा भार सोपविण्यात आला आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका जवळजवळ सर्वच विभागाला बसत असून, उद्यान विभागाची स्थिती दयनीय आहे. शहरात महापालिकेच्या अखत्यारितील ९५ लहान, मोठी आणि मध्यम उद्याने आहेत. उद्यानाच्या विकासाची आणि देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ही उद्यान विभागाची आहे. मात्र, महापालिकेच्या उद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारी ६५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यातच कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामे करावी लागतात. महापालिकेच्या उद्यानांची देखभाल व्यवस्थित होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. देखभाल-दुरुस्तीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक अधिकाऱ्यांना जाब विचारतात. कामे केली नाहीत म्हणून त्यांना अनेकदा वेठीस धरण्यात येते. परंतु, विभागातील रिक्त पदे भरली कधी जाणार, असा प्रश्न महासभेत कुणीही उपस्थित करीत नाही.
५७ कर्मचारी अन्य विभागातविभागाची एकूण आस्थापना ही २७३ कर्मचाऱ्यांची आहे. आकृतिबंधात ही सर्व पदे मंजूर आहेत. परंतु १२१ कर्मचाऱ्यांची प्रत्यक्षात नियुक्ती करण्यात आली. अर्थात, १५२ पदे रिक्त आहेत. यापैकी ५७ कर्मचारी हे पालिकेच्या इतर विभागात कामाकरिता पाठविले. म्हणजेच केवळ ६५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर उद्यानांचा भार आहे.
वृक्ष निरीक्षक नाहीतशहरातील वृक्ष गणनेची कामे डिसेंबरअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. या कामासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून नियुक्त एजन्सीच्या कामावर देखरेख ठेवण्याकरिता लागणारे वृक्ष निरीक्षक महापालिकेत नाही. अशातच, वृक्ष गणना चुकीची होण्याची शक्यता बळावली आहे. एजन्सीच्या कामावर लक्ष राहावे याकरिता नवीन आराखड्यात वृक्ष निरीक्षक आणि सहा.वृक्ष निरीक्षकांची पदे मंजुरीकरिता टाकण्यात आली असून सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर प्रस्ताव मंजुरीकरिता राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल.