नागपूर : कोरोनाने विद्यार्थ्यांना परीक्षा न देता नववीतून दहावीत व अकरावीतून बारावीत ढकलले. अख्खे सत्र विना शिक्षणाचे आटोपले आणि आता तोंडावर परीक्षा आल्या. त्यातही आता साडेतीन तास पेपर सोडवायचा आहे. लिखाणाचा सराव राहिलेला नाही. ११.३० ते ५.३० शाळेतील बैठकीची सवय सुटली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. शाळा बंद असल्याने सराव परीक्षा नाही, त्यामुळे उजळणी झाली नाही. ७५ टक्के अभ्यास केला पण कोणता, याची माहिती विद्यार्थ्यांना नाही. अभ्यास पूर्ण न झाल्याने आत्मविश्वास हरविला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे या अडचणीच परीक्षा ठरत आहे.
दहावी आणि बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे सत्र साधारणत: मे महिन्यापासून सुरू होते. कोरोनामुळे जूनपर्यंत हालचालीच झाल्या नाही. जून महिन्यानंतर शहरातील काही शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला. पण ग्रामीण भागात दिवाळीपर्यंत ऑनलाईनचा गंधही दिसून आला नाही. दिवाळीनंतर काही शाळांना जाग आली खरी, पण ऑनलाईनच्या अडचणी मोठ्या प्रमाणात भेडसावल्या. ग्रामीण भागात तर ८० टक्के विद्यार्थ्यांचा अभ्यासच झाला नाही.
शिक्षणाचे मूळ सूत्र वाचन, लेखन आणि पठण आहे. ऑनलाईनमध्ये ते झालेच नाही. विज्ञान, गणितसारखे विषय शिक्षकांनी शिकविले, पण विद्यार्थ्यांना ते रुचलेच नाही. होमवर्क दिला पण तो तपासल्याच गेला नाही. रिचार्जच्या अडचणी, नेटवर्कची कनेक्टीव्हीटी याची डोकेदुखी कायमच राहिली. विद्यार्थी शिक्षकांपासून तुटला, त्यामुळे अभ्यास करवून घेण्याची सवयही सुटली. शिक्षणातील या सर्व मूलभूत गोष्टी सुटल्याने परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम झाला आहे.
- या आहेत अडचणी
१) शहरात ४० टक्के तर ग्रामीणमध्ये २० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले.
२) अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही.
३) सराव परीक्षा झाल्या नसल्याने उजळणी झाली नाही.
४) लेखनाचा, बसण्याचा सराव नाही.
५) परीक्षेची तयारीच झाली नसल्याने आत्मविश्वास हरविला.
६) शिक्षण ऑनलाईन परीक्षा ऑफलाईन असल्याने पेपर पॅटर्न कळला नाही.
७) ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांनी पुस्तकेच उघडली नाही.
८) कोरोनामुळे नववीतून जसे दहावीत गेलो तसे दहावीतून अकरावीत जाऊ, अशी झाली विद्यार्थ्यांची मानसिकता.
९) अनेक विद्यार्थ्यांची ड्रॉपला पसंती.
- यंदा परीक्षा ही केवळ एक फॉर्मालिटी आहे. ग्रामीण भागातील ६० टक्के विद्यार्थ्यांनी पुस्तकेच उघडली नाही. अभ्यास काय करावा, याचेही भान नाही. परीक्षेचा वेळ वाढविण्यापेक्षा किती अभ्यास झाला, याकडे लक्ष देण्याची गरज होती. मुलांच्या डोक्यात जसे नववीतून दहावीत गेलो, तसे दहावीतून अकरावीत जाऊ हे फिट आहे.
राजश्री उखरे, प्राचार्य
- यावर्षी मुलांचे अभ्यासाचे ज्ञान शून्य आहे. परीक्षेला बसविणे एक खानापूर्ती आहे.
डॉ. अशोक गव्हाणकर, प्राचार्य
- आता प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज आहे.
३० दिवस आता उरले आहेत. ऑनलाईनमध्ये काहीच कळले नाही. किमान या ३० दिवसात मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
राहुल गौर, प्राध्यापक