नागपूर : मस्कतहून बँकॉकला जाणाऱ्या एका विमानाचे बुधवारी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक ‘लॅण्डिंग’ करण्यात आले. विमानात एका प्रवाशाला श्वास घेताना त्रास होऊ लागल्यानंतर विमान आपातस्थितीत नागपुरात उतरविण्यात आले. या रुग्णाला तातडीने किम्स किंग्जवे हॉस्पिटलमध्ये ् करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.
ओमानच्या मस्कतहून ओमान एअर कंपनीचे डब्ल्यूवाय ०८१५ विमान सकाळी ९ वाजता बँकॉककडे रवाना झाले. ड्रीमलाइनर विमानाला मस्कतहून बँकॉकपर्यंत एकूण ४ हजार ५६० किलेामीटरचे अंतर कापायचे होते. विमानात ४७ वर्षीय प्रवासी नाजी व त्यांची पत्नी हे नातेवाईकासह प्रवास करत होते.
प्रवासादरम्यान नाजी यांना श्वास घेताना अचानक त्रास होऊ लागला आणि छातीत दुखणे वाढले व उलटी झाली. याची माहिती मिळताच वैमानिकांनी तातडीने नागपूरविमानतळावर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि मेडिकल इर्मजन्सीसाठी लॅण्डिंगची परवानगी मागितली. अखेर २२७० किलोमीटरचे अंतर कापून विमान नागपूर विमानतळावर दुपारी १:२४ वाजता उतरले. विमानातील रुग्णावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून, प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर आणि डॉक्टरांच्या आवश्यक सूचनेनंतर विमान अन्य प्रवाशांना घेऊन बँकॉककडे रवाना झाले.