लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे विद्यार्थी व पालकांना टेंशन आहे. सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा दिव्यांग विद्यार्थ्यांचे टेंशन त्यापेक्षा जास्त आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा सोडविण्यासाठी आवश्यक असणारा लेखनिक मिळणे अवघड झाले आहे. शहरातील दिव्यांग शाळांनी लेखनिक उपलब्ध व्हावा म्हणून सामान्यांच्या शाळा व्यवस्थापनाकडे मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
दिव्यांगांच्या श्रेणीतील अंध, अस्थिव्यंग, मतिमंद या विद्यार्थ्यांना लेखनिकाची गरज भासते. दहावी आणि बारावीत अंध विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. नागपूर जिल्ह्यात दोन शाळेतून दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला प्रवीष्ट होतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच परीक्षेची तयारी करून घेणे व त्यांना परीक्षेच्या काळात लेखनिक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळांची असते. दिव्यांग शाळांच्या परिसरातील शाळा अथवा ओळखीच्या शाळांना पत्र पाठवून लेखनिकांची मागणी केली जाते आणि शाळा त्या विद्यार्थ्यांना लेखनिकही उपलब्ध करून देतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे लेखनिकांची अडचण निर्माण झाली आहे. सामान्यांच्या शाळांनी लेखनिकासाठी दिव्यांग शाळांना प्रतिसादच दिलेला नाही.
दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचण अशी आहे की, गणित विषय सोडल्यास इतर सर्व विषयांसाठी नवव्या वर्गाचा विद्यार्थी लेखनिक म्हणून मदत करू शकतो. परंतु गणित विषयासाठी त्यांना सहाव्या वर्गाचा लेखनिक उपलब्ध करून द्यावा लागतो. सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अतिशय लहान असल्याने त्याचे पालक त्याला परीक्षेला पाठवतील की नाही? हा प्रश्नच आहे. मुळात पालकांमध्ये सुद्धा कोरोनाची भीती आहे. शाळाही बंद आहेत. अशात लेखनिक शोधणे आणि त्याच्या पालकांकडून होकार मिळणे अडचणीचेच आहे.
- नागपूर जिल्ह्यातून प्रवीष्ट होणारे दिव्यांग विद्यार्थी
दहावी - २५
बारावी - ३६
- दहावीच्या सर्वच पेपरला नववीचा विद्यार्थी असावा लेखनिक
आमचे प्रयत्न सुरू आहेत. परीक्षेच्या वेळेपर्यंत लेखनिक मिळतीलही. पण गणिताच्या पेपरसाठी सहाव्या वर्गाच्या लेखनिकाची जी अट आहे, त्यासाठी लेखनिक शोधणे अवघड होणार आहे. बोर्डाने सहावीच्या विद्यार्थ्यांचा आग्रह न धरता नववीच्या विद्यार्थ्यांनाच गणिताचा पेपर सोडविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही बोर्डाला करणार आहोत.
- लक्ष्मण खापेकर, सचिव, ज्ञानज्योती अंध विद्यालय