लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात पाच नवीन काेळसा खाणींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. नागपूरच्या आसपास तीन औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आणि अनेक काेळसा खाणी असल्याने जिल्ह्यात प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत असून, दरवर्षी वाढणारे तापमान असह्य करीत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा काेळसा खाणींना मंजुरी दिल्याने नागपूरकरांच्या त्रासात भर पडणार आहे. विदर्भाच्या पर्यावरणावर घातक परिणाम करणाऱ्या या निर्णयावर पर्यावरणवादी संघटनांनी तीव्र आक्षेप नाेंदविला आहे.
केंद्र शासनाने काेळसा विक्रीच्या उद्देशाने काेळसा खाणींची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. या खाणी खाजगी क्षेत्रांना वितरित केल्या जाणार आहेत. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यात दहेगाव/मकरधाेकडा ४, गाेंडखैरी, खापा व विस्तार, दहेगाव-धापेवाडा व टाेंडखैरी खंडाळा, हिंगणा बाजारगाव व कळंबी कळमेश्वर येथे नवीन काेळसा खाणी प्रस्तावित आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या भिवकुंड येथे खाण प्रस्तावित आहे. गाेंडखैरी काेल ब्लाॅक अदानी पाॅवरला तर भिवकुंड काेल ब्लाॅक सनफ्लॅगला वितरित करण्यात आली आहे.
काेळसा खाणींना मंजुरी देण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विदर्भ एनव्हायर्नमेंट ॲक्शन ग्रुप (व्हीआयएजी)ने तीव्र विराेध केला आहे. ग्रुपचे संयोजक सुधीर पालीवाल म्हणाले, विदर्भ आधीच खाणी आणि औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणाने पीडित आहे. अशात नवीन काेळसा खाणी सुरू केल्यास प्रदूषणाचा स्तर प्रचंड वाढेल आणि नागरिकांना आराेग्य समस्यांचा सामना करावा लागेल. पालिवाल यांच्या मते या नवीन खाणींमधून निघणाऱ्या काेळशाचा उपयाेग स्वाभाविकपणे विद्युत केंद्रातच केला जाणार आहे. विदर्भात आधीच मुबलक प्रमाणात विजेचे उत्पादन केले जाते आणि त्या प्रदूषणाचा त्रासही येथील लाेकांना भाेगावा लागताे आहे. नवीन वीज केंद्रे या प्रदूषणात आणखी भर घालणार आहेत. यावर धक्कादायक म्हणजे एकाही वीज केंद्रावर प्रदूषण राेखण्यासाठी एफजीडी प्लॅन्ट लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या नव्या खाणी सुरू झाल्या तर विदर्भ हे देशातील सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र म्हणून ओळखले जाईल, असा धाेका त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरणाचीही मंजुरी नाही
नवीन काेळसा खाणी नागपूर शहराच्या २५ किलाेमीटरच्या परिघात आहेत. मात्र यांची बाेली लावण्यापूर्वी काेळसा मंत्रालयाने पर्यावरणाबाबत आवश्यक काेणत्याही परवानग्या घेतलेल्या नसल्याचा आराेप व्हीआयएजीने केला आहे. या नवीन काेळसा खाणींमुळे विदर्भातील सुपीक जमीन ओसाड हाेण्याची भीती संस्थेने व्यक्त केली आहे.
हिट आयलँड इफेक्टचा सामना
नागपूर शहर आधीच अर्बन हिट आयलँड इफेक्टच्या प्रभावात आहे. नीरीच्या अहवालानुसार दाेन दशकात सरासरी तापमानात ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००० ते २०१९ पर्यंत १८ उष्ण लहरींचा सामना करावा लागला तर १६ वेळा सर्फेस टेम्प्रेचर सरासरीपेक्षा वर गेलेले आहे. याचे कारण वाढत्या वाहनसंख्येसह आसपास असलेली वीज निर्मिती केंद्रे आणि अनेक प्रकारच्या खाणी असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.