लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या पीलर उभारणीचे काम जोरात सुरू असल्याने अगोदरच हिंगणा रोड, सीए रोड, कामठी रोड आणि वर्धा रोडची अवस्था खराब झाली आहे. अशा परिस्थितीत आता महामेट्रोने शहरातील अंतर्गत रस्तेही केबल टाकण्याच्या नावावर खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास आणखी वाढला आहे.अलीकडेच महामेट्रोने केबल टाकण्यासाठी महाराजबाग रोडवर खोदकाम सुरू केले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम सात ते आठ महिन्यांपूर्वीच करण्यात आले आहे. तेव्हा ‘शहरातील विकास कामांबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका होत असतात. तेव्हा अशा गोष्टींवर चर्चा होत नाही का? ’असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठ महिन्यांच्या आतच नवीन रस्त्यांचे खोदकाम होत असेल तर त्यावर झालेला खर्च वाया जाणार नाही का? हा खर्च वाचवता आला असता.फूटपाथवरील टाईल्सही काढल्याविद्यापीठ चौक ते महाराजबागमार्गे विद्यापीठ ग्रंथालय चौकापर्यंतचा रस्ता नुकताच बांधण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फूटपाथही बनवण्यात आले. परंतु महामेट्रोने येथे केबल टाकण्याचे काम सुरू केल्यानंतर सर्वप्रथम येथील फूटपाथवरील टाईल्स काढल्या. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शहरात रिलायन्सने केबल टाकण्यासाठी खोदकाम केले होते. फूटपाथही तोडले होते. तेव्हा कंपनी स्वत: फूटपाथची दुरुस्ती करून देईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु तसे झाले नाही. विशेष म्हणजे मनपा प्रशासनानेही ते काम पूर्ण करणे योग्य समजले नाही किंवा संबंधिताविरुद्ध दंड ठोठावून कुठली कारवाईसुद्धा केली नाही.समन्वयाचा अभाव का?शहरात मेट्रो रेल्वेचे काम जोरात सुरू आहे. परंतु मागील काही वर्षात मेट्रोचे इतर शासकीय विभागांशी समन्वय दिसून येत नाही. शहरात वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी मेट्रोने स्वत:चे कर्मचारी तैनात केले आहे. परंतु त्यांना वाहतूक विभागाची पाहिजे तशी मदत मिळत नाही. तसेच महापालिका क्षेत्रातही काम सुरू आहे. परंतु मनपासोबत त्यांचा ताळमेळ वेळोवेळी जुळत नसल्याचे दिसून येते. ज्या रस्त्याचे काम सात ते आठ महिन्यांपूर्वी शासकीय खर्चातून करण्यात आले. तोच रस्ता आता केवळ केबल टाकण्याच्या नावावर खराब केला जात आहे. हे ताजे उदाहरण दोन विभागातील समन्वयाचा अभाव दर्शविणारे आहे. महामेट्रोच्या केबल टाकून झाल्यावरही रस्त्याचे काम केले जाऊ शकले असते.
नागपुरातील नवीन कोरा महाराजबाग रोडही खोदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:27 PM
महामेट्रोच्या पीलर उभारणीचे काम जोरात सुरू असल्याने अगोदरच हिंगणा रोड, सीए रोड, कामठी रोड आणि वर्धा रोडची अवस्था खराब झाली आहे. अशा परिस्थितीत आता महामेट्रोने शहरातील अंतर्गत रस्तेही केबल टाकण्याच्या नावावर खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास आणखी वाढला आहे.
ठळक मुद्देमहामेट्रोने सुरू केले काम