लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डीआयजी मनीष कुमार सिन्हा हे आता सीबीआय नागपूर शाखेचे प्रमुख असतील. बुधवारी दिल्ली येथील सीबीआयच्या मुख्यालयात झालेल्या बदल्यांतर्गत सिन्हा यांची नागपूरला बदली करण्यात आली. त्यांची बदली जनहितार्थ करण्यात आल्याचा उल्लेख करीत तातडीने त्यावर अमल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आपल्याच नंबर दोन पदावरील प्रमुख असलेले राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयमध्ये वादळ उठले आहे. या वादळात सिन्हा यांच्यासह दोन डझन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सिन्हा हे भारतीय पोलीस सेवेच्या २००० बॅचचे अधिकारी आहेत. ते आंध्र प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत. ते प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये तैनात आहेत. आॅगस्ट २०१७ मध्ये नागपूर शाखेत विजयेंद्र बिदारी यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दोन महिन्यापूर्वीच त्यांची बंगळुरूच्या बँकिंग फ्रॉड शाखेत बदली करण्यात आली आहे. तेव्हापासून बिदारी यांच्याकडेच नागपूर शाखेची अतिरिक्त जबाबदारीही होती. मागील काही दिवसांत महाराष्ट्र आणि दुसऱ्या राज्यातील काही आयपीएस अधिकारी प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये आले आहेत. तेव्हाही नागपूरला पूर्णवेळ सीबीआय प्रमुख मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली आता. सीबीआय मुख्यालयातील वादळामुळे सिन्हा यांची नागपूरला बदली झाल्याने सीबीआयला नवे प्रमुख मिळाले आहेत. कामकाजाच्या दृष्टीने सीबीआय नागपूर शाखा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एक वेळ असाही होता जेव्हा या शाखेने लाचखोरी आणि उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणात रेकॉर्ड कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात इतर शाखांना मागे टाकले होते. डब्ल्यूसीएलच्या अधिकाºयास लाच घेताना अटक करणे आणि उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचे मोठे प्रकरण नागपुरातच दाखल होत होते. नागपूर शाखेंतर्गत डब्ल्यूसीएल, मॉईल, आयकर, केंद्रीय अबकारी विभाग, रेल्वे, सेनासह अनेक महत्त्वाचे विभाग येतात. काही दिवसांपासून नागपूर विभागाची कारवाई मंदावली होती.
पहिल्यांदा डीआयजी स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती सीबीआयच्या प्रत्येक शाखेत एक प्रमुख (एचओबी) असतो. नागपूर शाखेत आतापर्यंत अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांना नियुक्त केले जात होते. पहिल्यांदाच डीआयजी (उपमहानिरीक्षक) स्तरावरील अधिकाऱ्यास एचओबी (हेड आॅफ ब्रँच) बनवण्यात आले आहे.