लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरासह देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे पर्युषण पर्व घरातूनच पाळण्याचे आवाहन जैन साधूंनी केले आहे. दिगंबर जैन समाजाचे पर्युषण पर्व रविवार २३ ऑगस्टपासून सुरू होत असून १ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.पर्युषण पर्वाला आत्मशुद्धीचे पर्व, त्यागाचे पर्व आणि सर्व पर्वांचा राजा म्हटले जाते. पर्युषण पर्वाला दशलक्षणदेखील म्हटले जाते. या पर्वामध्ये व्रत, पूजन, तप, संयम, साधना केली जाते. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंतचे सर्व श्रावक-श्राविका उपवास ठेवतात. या पर्वाची सर्वांनाच मोठी उत्सुकता असते. पर्युषण पर्वाचे दहा दिवस वेगवेगळ्या धर्माच्या नावाने ओळखले जातात. पर्युषण पर्वाचा पहिला दिवस उत्तम क्षमा धर्म असतो. त्यानंतर दुसरा दिवस मार्दव धर्म, तिसरा दिवस उत्तम आर्जव धर्म, चौथा दिवस उत्तम सत्य धर्म, पाचवा दिवस उत्तम शौच धर्म, सहावा दिवस उत्तम संयम धर्म, सातवा दिवस उत्तम तप धर्म, आठवा दिवस उत्तम त्याग धर्म, नववा दिवस उत्तम आकिंचन्य धर्म आणि दहावा दिवस उत्तम ब्रह्मचर्य धर्म असतो. जैन मान्यतेमधील हा सर्वात मोठा सण आहे. या काळात जैन मंदिरांमध्ये सकाळपासूनच आवागमन असते. अभिषेक, पूजन, विधान आदींचे दिवसभर मंदिरात आयोजन होत असते. श्रावक-श्राविका दूरवरून मंदिरांमध्ये येतात. अनेक महानुभाव तर अभिषेक पाहिल्यावर किंवा पूजन केल्यावरच पाणी किंवा अन्य वस्तूंचे ग्रहण करतात. पर्युषण पर्वाच्या अखेरच्या दिवशी जैनधर्मीय बांधव एकमेकांची क्षमायाचना करतात.जैन संत वात्सल्यवारिधी आचार्यश्री वर्धमानसागरजी, संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागरजी, आचार्यश्री पुष्पदंतसागरजी, सारस्वताचार्य देवनंदीजी, आचार्यश्री गुप्तिनंदीजी, आचार्यश्री पुलकसागरजी यांनी यावर्षी पर्युषण पर्व घरातच पाळावे, असे आवाहन केले आहे. सर्व प्रकारचे व्रत, पूजन घरातच करावे. मंदिरात कोणत्याही कार्यक्रमांचे, क्षमावाणीचे आयोजन करू नये. एकमेकांना मोबाईल, टेलिफोनसारख्या संपर्क साधनांच्या माध्यमातून क्षमायाचना करावी. अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दिगंबर जैन समाजाचे पर्युषण पर्व २३ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 1:10 AM
शहरासह देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे पर्युषण पर्व घरातूनच पाळण्याचे आवाहन जैन साधूंनी केले आहे.
ठळक मुद्देघरूनच पर्व पाळा : जैन संतांनी केले आवाहन