नागपूर : प्रभाग क्रमांक २२ मधील नबाबपुरा बागेलगतचा मार्ग चांगल्या स्थितीत असतानाही कंत्राटदाराकडून खोदकाम करून सिमेंटीकरण केले जात आहे. हा सार्वजनिक संपत्तीचा अपव्यय असून, यात भ्रष्टाचार असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला घेराव घातला तसेच या कामाची चौकशी करण्याची मागणी केली.
मार्ग सुस्थितीत असतानाही खोदकाम करून त्यांचे सिमेंटीकरण होत असल्याने प्रशासनाला यावेळी जाब विचारण्यात आला. या कामामुळे जनतेला असुविधा होत असून, याची चौकशी करण्याची मागणी युवक काँग्रेस पूर्व नागपूरचे अध्यक्ष अक्षय घाटोळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांकडे केली. यासंदर्भात एक निवेदन सादर केले असून, अभियंत्यावर कारवाईची मागणी केली. घाटोळे म्हणाले, रस्ता चांगल्या स्थितीत असताना खोदकाम करून नव्याने बांधण्याची गरज नव्हती. या कामाला अभियंता शिवचरण पुरी यांनी परवानगी कशी दिली, याची चौकशी व्हावी. चौकशीत ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी. या प्रकरणाची चौकशी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.