नागपूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाला अभिवादन केले. काँग्रेसतर्फे सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती समारंभाचा समारोप नागपुरात होणार आहे. त्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते शुक्रवारी नागपुरात आले होते. डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी १२ वाजता ते थेट दीक्षाभूमीला आले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री नितीन राऊत, अनिस अहमद, आ. शरण रणपिसे, प्रामुख्याने उपस्थित होते. दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकरांच्या अस्थिकलशाला अभिवादन केल्यावर त्यांनी मध्यवर्ती स्मारकातील डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचेही निरीक्षण केले. यावेळी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, सुधीर फुलझेले व विजय चिकाटे यांनी दिग्विजय सिंह यांना पुष्पगुच्छ तसेच दीक्षाभूमीचे पोट्रेट, बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. (प्रतिनिधी)
दिग्विजय सिंह यांची दीक्षाभूमीला भेट
By admin | Published: April 02, 2016 3:25 AM