लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला ११ सप्टेंबर रोजी सव्वाशे वर्षे पूर्ण झाली. या ‘दिग्विजय’ दिवसाकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे निर्देश असतानादेखील अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. स्वामी विवेकानंदांच्या त्या भाषणाचे वाचन करण्यासाठी वेळ काढण्याची तसदीदेखील महाविद्यालयांनी घेतली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे भाषण केले होते व भारताची ख्याती जगभरात गेली होती. या भाषणाला सव्वाशे वर्षे होत असल्यामुळे देशभरातील अनेक ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद हे युवावर्गाचे आदर्श आहेत. त्यामुळे नागपूर विद्यापीठातदेखील हा दिवस साजरा व्हायला पाहिजे, असा प्रस्ताव डॉ. निरंजन देशकर यांनी व्यवस्थापन परिषदेसमोर मांडला. या प्रस्तावाला सदस्यांनी अनुमोदन दिले व व्यवस्थापन परिषदेने हा प्रस्ताव संमत केला.त्यानुसार विद्यापीठाने २ सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी केले व हा दिवस नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभाग, संचालित महाविद्यालये व संलग्नित महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याचे निर्देश दिले. महाविद्यालयांना विद्यार्थी विकास संचालक डॉ. दिलीप कावडकर यांनी पत्रदेखील पाठविले. यादिवशी विवेकानंद यांच्या त्या भाषणाचे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाचन करण्याचे निर्देश देण्यात आले.मंगळवारी काही महाविद्यालयांनी यासंदर्भात तयारी केली होती व वेळापत्रकानुसार विद्यार्थी, शिक्षकांच्या उपस्थितीत त्या ऐतिहासिक भाषणाचे वाचनदेखील झाले. मात्र अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या निर्देशाकडे चक्क पाठच फिरविली. कुठल्याही प्रकारे भाषणाचे वाचन झाले नाही व याबाबत शिक्षक, विद्यार्थ्यांना कल्पनादेखील देण्यात आली नव्हती. विद्यापीठाच्या काही विभागांमध्येदेखील अशीच स्थिती होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.वर्ग झाले, वाचन नाहीकाही महाविद्यालयांत स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचे नावापुरते वाचन झाले. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित असताना त्यांना वर्गातून बोलविण्याची तसदी न घेता केवळ काही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भाषणाची औपचारिकता आटोपण्यात आली.कारवाई काय करणार ?परिपत्रकानुसार विद्यापीठातील सर्व विभाग व महाविद्यालयात ‘दिग्विजय दिवस’ साजरा करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले होते. या आयोजनाचा अहवाल विभाग व महाविद्यालयांना छायाचित्रांसह विद्यार्थी विकास विभागाच्या संचालकांकडे पाठवायचा आहे, असे स्पष्ट केले होते. याबाबत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप कावडकर यांच्याशी संपर्क केला असता काही महाविद्यालये व विभागांचेच अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व महाविद्यालयांना १२ सप्टेंबरपर्यंत अहवाल पाठवायचे आहे. जी महाविद्यालये अहवाल पाठविणार नाहीत, त्यांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावू असे त्यांनी सांगितले. मात्र कुठली ठोस कारवाई होईल का याबाबत त्यांनी सध्या सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.