लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीवर तीन दिवस चालणाऱ्या धम्मचक्र प्रर्वतनदिनाच्या सोहळ्यात देश-विदेशातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपसंचालक आरोग्य विभाग, महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोस नॅशनल असोसिएशन व सार्थक बहुउद्देशीय संस्थेने पहिल्याच दिवशी सुमारे १० हजार अनुयायांना आरोग्य सेवा दिली. उपसंचालक आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सेवा देण्याचे हे २८ वे वर्ष आहे. सोमवारी या आरोग्य केंद्राचे उद्घाटन आरोग्य सेवेचे माजी संचालक व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे जनरल मॅनेजर डॉ. संजीव कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी नागपूर आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह मनीष नंदापवार, डॉ. नंदेश्वर पुरुषोत्तम, डॉ. लोखंडे, डॉ. इंदूरकर, डॉ. वाट, डॉ. धकाते व डॉ. मिलिंद गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. जयस्वाल यांनी सांगितले, उपसंचालक आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित आरोग्य केंद्र हे २४ तास रुग्णसेवेत असेल. यासाठी ३६ वैद्यकीय अधिकारी, ३१ परिचारिका, १६ फार्मासिस्ट व ३४ चतुर्थ कर्मचारी यांची २४ तास ड्युटी लावण्यात आली आहे. दोन विशेष खाटांची सोय करण्यात आली आहे. याशिवाय १५ रुग्णवाहिका सज्ज आहेत. सोमवारी दिवसभरात पाच हजार रुग्णांची तपासणी करून त्यांना नि:शुल्क औषधी देण्यात आल्याचेही डॉ. जयस्वाल यांनी सांगितले.मुंबईच्या संस्थेची रुग्णसेवा ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पाेरेशन लिमिटेड व ऑल इंडिया एससी, एसटी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन(ओएनजीसी)च्यातवीने गेल्या १८ वर्षांपासून दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना आरोग्य सेवा पुरविली जात आहे. या उपक्रमात मुंबईतील डॉक्टरांसह नागपूरच्या डॉक्टरांचाही सहभाग असतो. मोफत उपचारापासून ते औषधापर्यंत आणि नि:शुल्क चष्म्यांचे वाटप केले जाते, अशी माहिती लक्ष्मीकांत महाजन यांनी दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज नॅशनल असोसिएशनदीक्षाभूमी परिसरातील चोखामेळा वसतिगृहाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज नॅशनल असोसिएशनच्यावतीने १०० निवासी डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य सेवेचे कार्य सोमवारपासून सुरू झाले. शिबिराचे उद्घाटन आयकर विभागाचे सहआयुक्त डॉ. उपसेन बोरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. नरेश तिरपुडे, डा. अनिल तांबे, डॉ. मिलिंद फुलपाटील, डॉ. शंकर खोब्रागडे उपस्थित होते. दिवसभरात या संघटनेने चार हजारावर रुग्णांना आपली सेवा दिली.सार्थक बहुउद्देशीय संस्था सार्थक बहुउद्देशीय संस्था व शिवसंस्कृती ढोलताशा पथकाच्यावतीने दोन दिवस नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सोमवारी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते झाले. या शिबिराला माधव नेत्रालय, लायन्स क्लब क्लासिक, नागपूर, संत गुलाबाबाबा आश्रम, सिरसपेठ आदींचे सहकार्य मिळाले आहे. शिबिराच्या आयोजनासाठी धनंजय महेस्कर, डॉ. संजय लहाने, प्रसाद मांजरखेडे, ज्योती गांधी, डॉ. विनोद जयस्वाल, शेखर आदमने, डॉ. घोरपडे व सावंत गजभिये आपली सेवा देत आहेत.
दीक्षाभूमी : पहिल्याच दिवशी १० हजारावर अनुयायांना दिली आरोग्य सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 9:02 PM
उपसंचालक आरोग्य विभाग, महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोस नॅशनल असोसिएशन व सार्थक बहुउद्देशीय संस्थेने पहिल्याच दिवशी सुमारे १० हजार अनुयायांना आरोग्य सेवा दिली.
ठळक मुद्देआरोग्य तपासणी केंद्राचे उद्घाटन : उपसंचालक आरोग्य विभाग, मनपाचा सहभाग