नागपूर : जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी लोकमतने लोकलढा पुकारला आहे. याची दखल अनेक संघटनांनी घेतली. त्याचे पडसाद सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतसुद्धा उमटले. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी दीक्षाभूमीला अ श्रेणी पर्यटनाचा दर्जा देण्याची एकमुखी मागणी केली. याची दखल घेत दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्याचा एकमुखी प्रस्ताव पारित करण्यात आला. हा प्रस्ताव आपण स्वत: मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करणार असून राज्य शासनातर्फे तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल आणि त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला राज्य शासनातर्फे नुकताच पर्यटनाचा ‘ब’ श्रेणीचा दर्जा घोषित करण्यात आला. दीक्षाभूमीचे महत्त्व लक्षात घेता हा निर्णय एकूणच अन्यायकारक असाच होता. तेव्हा लोकमतने पुढाकार घेतला आणि दीक्षाभूमीचे महत्त्व लक्षात घेऊन त्याला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी लावून धरली. सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर जोरदार चर्चा झाली. सदस्यांनी अतिशय आक्रमकपणे हा विषय लावून धरला. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला. आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी यावर आपली संतप्त भावना व्यक्त केली. ते म्हणाले, दीक्षाभूमीला तुमच्या दर्जाची गरज नाही. ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात तांत्रिक अडचण होती तर मग दर्जा का दिला गेला. तो परत पाठवायला हवा होता. ‘ब’ श्रेणीचा दर्जा देणे म्हणजे दुय्यम वागणूक देणे होये. ‘ब’ श्रेणी देऊन दीक्षाभूमीचे पावित्र्य भंग करायला नको होते. दीक्षाभूमीला कुठला दर्जा द्यायचा असेल तर तो ‘अ’ श्रेणीचाच दर्जा द्यावा. ड्रॅगन पॅलेसलाही मिळणार ‘अ’ दर्जा ४दरम्यान दीक्षाभूमीसह कामठी (नागपूर) येथील जगविख्यात ड्रॅगन पॅलेस यालासुद्धा अ श्रेणी पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी दीक्षाभूमीसोबतच्या प्रस्तावासोबतच केली जाईल. दरम्यान दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसच्या विकासासाठी नागपूर सुधार प्रन्यासला नोडल एजन्सी म्हणून पालकमंत्र्यांनी घोषित केले. अ श्रेणी दर्जा मिळेल, परंतु त्यापूर्वी दोन्हीचा डीपी प्लॅन तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीच हवी
By admin | Published: September 01, 2015 3:22 AM