नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढावी, अशीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र, आघाडी करताना काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या प्रबळ उमेदवारांना डावलण्याचा प्रयत्न झाला, सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर मात्र वेगळा विचार करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे नागपूर महापालिकेत सर्व वॉर्डांमध्ये तयारी करा, असे निर्देश गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नागपूरचे संपर्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.
वळसे पाटील यांनी मंगळवारी रविभवन येथे नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाचा आढावा घेतला. काही पक्षांना हिंदू- मुस्लीम वाद वाढवून दरी निर्माण करायची आहे. पेट्रोल, गॅस दरवाढ, महागाई आदी मुद्द्यांवर लक्ष विचलित करायचे आहे. त्यामुळे आपण सतर्क राहून जनतेमध्ये जागरुकता निर्माण करा, असे आवाहनही पाटील यांनी केली.
नागपूर शहरातील ज्वलंत मुद्दे कोणते, शासकीय पातळीवर त्यात काय दिलासा देता येऊ शकतो, याची माहिती गोळा करा व लोकांना दिलासा द्या, अशी सूचनाही त्यांनी केली. लोकसभा, विधानसभा लढत नाही किमान विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावर जिल्हा समित्या रखडल्या आहेत. त्या मार्गी लावल्या जातील, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
बैठकीला माजी मंत्री रमेश बंग, विदर्भ संपर्कप्रमुख सुबोध मोहिते, दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, सलील देशमुख, दुनेश्वर पेठे, महिला आयोग सदस्य आभा पांडे, प्रदेश संघटन सचिव श्रीकांत शिवनकर, प्रशांत पवार, वेदप्रकाश आर्य आदी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांवर सोपविली प्रभागाची जबाबदारी
- वळसे पाटील यांनी कुणाला कोणत्या प्रभागाची जबाबदारी हवी आहे, याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून घेऊन जबाबदाऱ्या निश्चित केल्या. संबंधित प्रभागात सक्षम उमेदवार सुचवणे, त्याच्या प्रचारासाठी यंत्रणा उभी करणे, पाठबळ मिळवून देणे आदी जबाबदारी संबंधित पदाधिकाऱ्यांवर राहणार आहे.