लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणघाट जळीत पीडितेला शुक्रवारी कृत्रिम नळीद्वारे जेवण देण्यात आले. प्रकृतीत किंचित सुधारणा होत असली तरी धोक्याबाहेर नसल्याची माहिती, ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे जळीत तज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवनवार व क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल यांनी पत्रपरिषदेत दिली.डॉ. अटल म्हणाले, आज पीडितेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गुरुवारी तिचा रक्तदाब वाढला होता. यामुळे औषधे बदलविण्यात आली. कालच्या तुलनेत आज रक्तदाब सामान्य आहे. परंतु हा रक्तदाब औषधाने कमी झालेला आहे. स्वत:हून नाही. कमी जास्त रक्तदाबामुळे लघवीवर परिणाम होतो. ही संसर्ग होत असल्याची लक्षणे आहे. यामुळे यात आम्ही किती यशस्वी होऊ हे आतातरी सांगणे कठीण आहे. पीडितेचे नव्याने ड्रेसिंग करण्यात आले. शरीरात जंतूसंसर्ग कुठला आहे, याच्या चाचण्या केल्या जातील. सध्यातरी पीडितेला व्हेंटिलेटरची गरज पडली नाही. औषधांना दाद देत आहे. ती शुद्धीवर आहे. परंतु अद्यापही गंभीर आहे. डॉ. रेवनवार म्हणाले, जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून तिच्या कक्षातील खाटा रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. तिच्या कक्षात केवळ उपचारासाठी डॉक्टर व परिचारिकांनाच जाण्याची परवानगी आहे. निवडक लोकांना काचेतून पाहण्याची व्यवस्था केली आहे.
केंद्राकडून मदतीची मागणी केली-खा. तडसवर्धा जिल्ह्याचे खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागपुरातील ऑ रेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या प्रकृतीची चौकशी केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हिंगणघाटमधील घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. लोकसभेत शून्यकाळात सर्व खासदारांनी या घटनेवर आपले विचार मांडले. अशा घटना घडूच नये. कायद्याचा धाक असावा म्हणून कडक नियम तयार करायला हवे. वेळ पडली तर या विषयावर एक दिवसाचे अधिवेशन व्हायला हवे. त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीही आहे. या घटनेचे पडसाद जसे महाराष्ट्रात तसे संसदेतही उमटले आहे. पीडितेला केंद्राकडून मदत व्हावी म्हणून भारताचे गृहमंत्री अमित शाह व केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना विनंती केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही पीडितेला मदत द्यावी, असेही ते म्हणाले.