विदर्भ मोलकरीण संघटनेचा उपक्रम : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम नागपूर : विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे मोलकरणींच्या शिक्षणासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत ज्या मोलकरणींचे शिक्षण अर्धवट राहिले आहे, त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देऊन त्यांना पदविका देण्याचा संकल्प संघटनेने केला. यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. कृष्णकुमार चौबे यांच्याशी चर्चा करून रुपाताई कुळकर्णी यांनी एक अभ्यासक्रम तयार केला. विद्यापीठाने हा अभ्यासक्रम मान्य करून तो राबविण्याची तयारी दर्शविली. या अभ्यासक्रमाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम सर्वोदय आश्रम, विनोबा विचार केंद्र येथे पार पडला. याप्रसंगी डॉ. रुपाताई कुळकर्णी आणि अॅड. विलास भोंगाडे यांच्या हस्ते या घरकामगार डिप्लोमा अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या अभ्यासक्रमाला प्रथमच महाराष्ट्रातून नागपूर, नाशिक आणि हिंगोली या तीन केंद्रातून प्रत्येकी ५६ विद्यार्थ्यांची नावे नोंदविण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक मोलकरणीला केवळ १०० रुपये शुल्क द्यावे लागणार असून उर्वरित ९०० रुपयांचे शुल्क राज्य शासनाचे घरेलु कामगार बोर्ड देणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे सचिव विलास भोंगाडे होते. अभ्यासक्रमाच्या नागपूर येथील केंद्र समन्वयक अॅड. जुई मेश्राम यांनी यावेळी मोलकरणींना मोठी स्वप्न पाहण्याचे आवाहन केले. विलास भोंगाडे यांनी संघटनेचे बळ वाढविण्याचे आवाहन केले. रुपाताई यांनी हा उपक्रम सर्व मोलकरणींनी यशस्वी करावा, असे आवाहन केले. याप्रसंगी विद्या हटवार आणि विजया शिंगणे यांचीही भाषणे झाली. छाया चवळेंनी प्रास्ताविक तर शैला पपालकर यांनी आभारप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)
घरकामगारांसाठीही आता डिप्लोमा
By admin | Published: August 04, 2014 12:52 AM