लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. रुग्णांची साखळी खंडित झाल्याचे बोलले जात आहे. चार बाधितांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामुळे आता कुणी संशयित आल्यास त्याला आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. येथूनच नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले जातील. संशयिताला लक्षणे दिसल्यास किंवा पॉझिटिव्ह आल्यावरच मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.नागपुरात आतापर्यंत १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ४ रुग्णांवर रुग्णालयात १४ दिवस ठेवून उपचार करण्यात आले. त्यांचे तिन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने गेल्याच आठवड्यात रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यानंतर १२ बाधित रुग्णांची नोंद झाली. यांच्या संपर्कात आलेल्यांचे सर्व नमुने निगेटिव्ह आले. यामुळे कोरोनाबाधित रुग्णाची साखळी खंडित झाली आहे. सध्या १२१५ संशयित ‘होम क्वारेन्टाईन’ आहेत तर आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात ३३७ संशयित आहेत. सध्यातरी यातील कुणात लक्षणे नाहीत. यामुळे बुधवारी ज्या संशयितांना लक्षणे दिसून येतील किंवा त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येतील त्यांनाच मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णालयावर रुग्णांचा भार कमी होण्याची शक्यता आहे.
मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाची थेट भरती बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:53 PM
संशयिताला लक्षणे दिसल्यास किंवा पॉझिटिव्ह आल्यावरच मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
ठळक मुद्देसंशयितांना विलगीकरण कक्षातच ठेवणार : लक्षणे किंवा पॉझिटिव्ह आल्यावरच रुग्णालयात भरती