लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य विधिमंडळाप्रमाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाची नियमावली तयार केली आहे़ कामकाजाच्या नियमावलीसह सदस्यांनाही विशेष अधिकार आणि आमदारांप्रमाणे ओळख (बॅच) देण्यात आली आहे़ आता विधिमंडळाच्या धर्तीवर सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाºया सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी सर्वपक्षीय नगरसेवक आग्रही आहेत.दर महिन्यात महापालिकेची सर्वसाधारण सभा होते़ सभेचे कामकाज संपल्यानंतर समिती विभागातर्फे सभेचे इतिवृत्त तयार केले जाते़ मात्र, सभेत चर्चा झालेले अनेक विषय प्रत्यक्ष सभेचे इतिवृत्त लिहिताना वगळले जातात़याबाबत विरोधकांप्रमाणे सत्ताधारी पक्षातील सदस्यही नाराज आहेत़ यामुळे सभेच्या कामकाजाचे रेकॉर्डिंग करण्याचा व कामकाजाचे स्थानिक वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे़सभागृहाच्या कामकाजात पारदर्शकता येण्यासाठीही थेट प्रक्षेपणाची मदत होईल़ परंतु सभेचे कामकाज लाईव्ह होणार असल्यामुळे नगरसेवकांना हुरूप येईल़ सभागृहात न बोलणाºया नगरसेवकांवर अप्रत्यक्षरीत्या जनतेचे लक्ष राहणार असल्यामुळे आजवर मौन धारण करणारे नगरसेवक सभागृहात बोलतील. अनेकदा सभागृहात एखाद्या विषयावरून गोंधळ होतो मात्र, सत्ताधारी बहुमताच्या आधारावर गोंधळातच प्रस्ताव मंजूर करतात़ प्रक्षेपणामुळे लोकांना याची माहिती मिळेल तसेच सभेच्या कामकाजाचे इतिवृत्त लिहिताना त्यात परस्पर बदल करता येणार नाही़शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत डस्टबिन वाटप, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बुद्धनगर येथील बुद्ध पार्क, महापालिकेतील ऐवजदार आदी विषयांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
मनपाच्या सभेचे थेट प्रक्षेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:40 AM
राज्य विधिमंडळाप्रमाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाची नियमावली तयार केली आहे़
ठळक मुद्देसर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव : इतिवृत्तातील फेरफार होण्याला आळा बसणार