लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये पंतप्रधान जनधन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे ५०० रुपये रोख जमा केले आहेत. ही रक्कम खातेदारांना ३ एप्रिलपासून विड्रॉल करता येईल. या संदर्भातील पत्र केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सहसचिव सुचिन्द्र मिश्रा यांनी जारी केले आहे.रोख रक्कम जमा केल्याचे पत्र स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका व प्रमुख खासगी क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. या संदर्भातील घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २६ मार्चला केली होती. त्यानुसार ५०० रुपयांची सानुग्रह राशी महिलांच्या खात्यात २ एप्रिलपासून जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून खातेदार महिलांना रक्कम संबंधित शाखा आणि एटीएममधून विड्रॉल करता येईल. जनधन योजनेतील बँक खात्याचा शेवटचा क्रमांक शून्य अथवा एक असेल त्यांना ३ एप्रिलला ५०० रुपये विड्रॉल करता येणार आहे. याशिवाय शेवटचा क्रमांक दोन अथवा तीन असेल त्यांना ४ एप्रिलला, चार अथवा पाच असेल त्यांना ७ एप्रिलला, सहा किंवा सात असेल त्यांना ८ एप्रिलला आणि आठ किंवा नऊ असेल त्या लाभार्थींना ९ एप्रिलला ५०० रुपये विड्रॉल करण्याची सोय आहे. याशिवाय ९ एप्रिलनंतरही खातेदाराला शाखेत जाऊन बँकिंग वेळेत रक्कम काढता येईल.बँक ५०० रुपये संबंधित खात्यात जमा करणार आहे. त्यानंतर उपरोक्त तारखांना बँकेतर्फे खातेदारांना मेसेज पाठविण्यात येणार आहे. बँकेतून पैसे विड्रॉल करण्यासाठी केंद्र सरकारने स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मदत करावी, असे पत्र राज्य शासनाला पाठविले आहे. याशिवाय शाखांचे अधिकारी आणि बिझनेस प्रतिनिधींना सूचना देण्यास सांगितले आहे.
जनधन योजनेतील महिलांच्या खात्यात थेट ५०० रुपये जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 8:00 PM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये पंतप्रधान जनधन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे ५०० रुपये रोख जमा केले आहेत.
ठळक मुद्दे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाची मदत : लाभार्थींना विड्रॉलची सोय, पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज