नागपूर : नागपूरवरून जबलपूरला जाण्यासाठी लवकरच थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची रेल्वे प्रशासनाची योजना आहे. कोल्हापूर-गोंदियादरम्यान सुरू असलेल्या ११०३९/११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेसचा बालाघाट, नैनपूर मार्गाने रीवापर्यंत विस्तार करण्याची योजना आखण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मुंबई झोनने शनिवारी याबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूर आणि पश्चिम मध्य रेल्वे जबलपूरला प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव सुरुवातीच्या टप्प्यात असल्यामुळे ही गाडी सुरू होते की नाही, हे अद्याप निश्चित नाही. या प्रस्तावात इतवारी आणि रीवादरम्यान सुरू असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक ०१७५३/०१७५४ ला महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये विलीन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ही गाडी इतवारी आणि रीवा येथून आठवड्यातून ३ दिवस धावत होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही गाडी सध्या रद्द आहे. प्रस्तावात महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या विस्तारानुसार टाइमटेबल देण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वेगाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूरवरून दुपारी २.४५ वाजता सुटून रात्री १०.१० वाजता पुणे, दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३५ वाजता नागपूर, ३.५४ वाजता इतवारी, सायंकाळी ६ वाजता गोंदिया, रात्री ११.५५ वाजता जबलपूर आणि पहाटे ४.२५ वाजता रीवाला पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ११०४० रात्री ८ वाजता रीवा येथून सुटून ११.५५ वाजता जबलपूर, सकाळी ८ वाजता गोंदिया, १०.०५ वाजता इतवारी, १०.४० वाजता नागपूर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता पुणे व दुपारी १२.२५ वाजता कोल्हापूरला पोहोचेल. महाराष्ट्र एक्स्प्रेसचा रीवापर्यंत विस्तार केल्यामुळे नागपूर आणि रीवादरम्यान दररोज रेल्वेगाडी उपलब्ध होणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. सध्या प्रवाशांना इतवारी-रीवा-इतवारी ही गाडी आठवड्यातून केवळ ३ दिवसच उपलब्ध असते.
............