नागपूर : राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित शुक्रवारी सकाळी नागपुरात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संक्षिप्त चर्चा करीत ते गडचिरोली दौऱ्यावर रवाना झाले. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते गडचिरोलीतील स्थिती जाणून घेणार आहेत.३० सप्टेंबरला पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तिसऱ्याच दिवशी थेट नक्षलवाद्यांच्या गुहेत दौऱ्यावर जाणारे दीक्षित पहिलेच पोलीस महासंचालक ठरले आहे. गुरुवारी रात्री ते मुंबईहून नागपूरकरिता निघाले. शुक्रवारी सकाळी दुरंतो एक्स्प्रेसने रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर तेथून ते पोलीस जिमखान्यात आले. त्यानंतर त्यांनी आपले ‘स्कॉटिंग आणि सिक्युरिटी गार्ड’ परत पाठविले. येथे निवडक अधिकारी आणि मोजक्या मान्यवरांशी थोडक्यात चर्चा केल्यानंतर ते सरळ गडचिरोलीला निघाले. दीक्षित शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस गडचिरोलीत थांबणार असून, येथील अधिकाऱ्यांकडून ते गडचिरोलीतील नक्षलवाद, पोलीस अन् सध्याच्या स्थितीची माहिती घेतील. गडचिरोलीत काय हवे, काय नको त्याची पाहाणी करून आवश्यक उपाययोजनांच्या पूर्ततेसाठी संबंधितांशी चर्चा करतील. त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) बिपीन बिहारी आहेत. तेसुद्धा आज सकाळी विमानाने नागपुरात पोहचले आणि दीक्षित यांच्यासोबत गडचिरोलीला गेले. साधेपणा आणि लोकाभिमुखतेवर भर देणारे अधिकारी म्हणून दीक्षित सुरक्षा यंत्रणेत ओळखले जातात. आपल्या पहिल्याच दौऱ्यात त्यांनी विमानाऐवजी रेल्वेने प्रवास करून पोलीस दलासह साऱ्यांनाच धक्का दिला आहे. (प्रतिनिधी)
महासंचालक दीक्षित गडचिरोली दौऱ्यावर
By admin | Published: October 03, 2015 3:19 AM