लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - रुग्णांकडून जास्तीची रक्कम घेऊन संगणकात कमी रकमेची नोंद करून फसवणूक केल्याप्रकरणी मेडिट्रीना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली ते गणेश रामचंद्र चक्करवार हे मेडिट्रीना हॉस्पिटलचे संस्थापक संचालक आहेत.
व्हीआरजी हेल्थकेअर प्रा.लिमिटेड या कंपनीअंतर्गत संचालित केल्या जाणाऱ्या मेडीट्रिना हॉस्पिटलमध्ये २००७ पासून ते भागीदार आहेत. आयकर सल्लागार म्हणून काम करणाऱ्या गणेश चक्करवार यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी आणि कंपनीच्या इतर विश्वस्तांनी डॉ. पालतेवार यांच्यावर विश्वास ठेवून हॉस्पिटलच्या कामकाजाची जबाबादारी सोपविली. त्याचा गैरफायदा घेत पालतेवारांनी हॉस्पिटलमध्ये रकमेची अफरातफर सुरू केली. जवाहरनगर भंडारा येथील विवेकानंद हटवार, भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील पुरुषोत्तम खापर्डे आणि रामटेक येथील वसंत डांबरे यांच्याकडून उपचाराच्या नावाखाली अनुक्रमे २,८६,०००, २,९९,६९३ आणि ३,६२,८२० रुपयांचे बिल देण्यात आले. प्रत्यक्षात हॉस्पिटलच्या रेकॉर्डवर अनुक्रमे ७३ हजार ६००, २ लाख ६९३ आणि १ लाख ३७ हजार ८८० रुपये दाखविण्यात आले. अशाप्रकारे संगणकीय प्रणालीचा गैरवापर करून डॉ. पालतेवार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ३६ हजार ४१५ रुपयांची अफरातफर केली. हा गैरप्रकार पुढे आल्यानंतर पालतेवारांना विचारणा केली असता, त्यांनी चक्करवार यांच्याशी असभ्य वर्तन करून त्यांना धमकावले. या आणि अशा अनेक गैरप्रकाराची तक्रार चक्करवार यांनी दोन वर्षांपूर्वी पोलीस आणि संबंधित वरिष्ठांकडे केली. मात्र, पालतेवारांशी मधूर संबंध असल्याने त्यावेळीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करूनही पालतेवारांवर विशेष मेहेरबानी दाखविली.
चक्करवारांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे आता त्याची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, शनिवारी सीताबर्डी पोलिसांनी डॉ. पालतेवारविरुद्ध फसवणुकीच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
...तर मोठे घोटाळे उजेडात
डॉ. पालतेवारांना पाठीशी घालणारा एक मोठा ब्रोकर शहरात आहे. तो नेहमी सेटिंगसाठी धावपळ करतो. आता पोलिसांनी कडक भूमिका घेऊन पालतेवारांना बेड्या ठोकल्यास मेडिट्रीनामधील अनेक घोटाळे उघड होऊ शकतात.