लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या अंबाझरीतील रुबईयात वाईन सेंटरच्या संचालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला दणका दिला.
युनिट दोनचे पथक शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास गस्त करीत होते. अंबाझरीतील साठे ऑर्नामेंटच्या समोर असलेल्या रुबईयात वाईन शॉपच्या समोर त्यांना एका दुचाकीवर सूरज लक्ष्मणराव वाढवे (वय ३०) हा संशयास्पद स्थितीत दिसला. पोलिसांनी त्याच्या जवळच्या बॅगची आणि त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या ४७ बाटल्या आढळल्या. या बाटल्या त्याने रुबईयात वाईन सेंटरचा संचालक अरविंद वासुदेवराव देशमुख याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. देशमुखने परवान्यातील अटी शर्थीचे उल्लंघन करून अवैध दारू विक्री केल्याचे चाैकशीत स्पष्ट झाल्याने वाढवेसोबत देशमुखविरुद्धही पोलिसांनी अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल केला. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिलीप चंदन, उपनिरीक्षक राजेंद्र घुगे, हवालदार आदित्य यादव, नायक अमित सिंग, शिपाई पराग फेगडे, चंद्रशेखर गाैतम आणि विनोद सानप यांनी ही कामगिरी बजावली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्या वाईन शॉपच्या संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.